Advertisement

पुण्या-मुंबईतली ‘घातक’ चढाओढ!

मागच्या काही दिवसांपासून कुठल्या शहरांत कोरोनाचे रुग्ण जास्त, यावरून पुणे-मुंबईत अप्रत्यक्षरित्या रंगलेली ही स्पर्धा सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे. एरवी तावातावाने भांडणारे पुणे-मुंबईकर या विषयावर मान वर करून अभिमानाने बोलू शकतील काय?

पुण्या-मुंबईतली ‘घातक’ चढाओढ!
SHARES

मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांचं कला-संस्कृती, शिक्षण, राहणीमान, विचारसरणीच्या बाबतीत आपापलं वैशिष्ट्य आहे. या दोन्ही शहरांत राहणाऱ्यांमध्ये हे कल्चर चांगलंच मुरलेलं असल्याने त्यांच्या स्वभावगुणांत, वागण्याबोलण्यातून ते अलगद ओघळतं. त्यामुळंच कुठल्याही त्रयस्त ठिकाणी गेल्यास या दोन्ही ठिकाणच्या लोकांचं वेगळेपण ठळकपणे नजरेत भरतं. पुणे आणि मुंबई शहरांत राहणाऱ्यांमध्ये आपल्या शहराविषयीचा अभिमान इतका ठासून भरला आहे की या दोन्ही शहरातील लोकं जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा आपलंच शहर किती उजवं आहे हे सांगण्यासाठी त्यांच्यात अनेकदा चढाओढ लागल्याचंही पाहायला मिळतं. एकमेकांना खेटून असलेल्या या महानगराची एकमेकांसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जणू स्पर्धाच चाललेली असते. ही स्पर्धा डेव्हलपमेंटच्या बाबतीत असेल, तर केव्हाही चांगलंच. परंतु मागच्या काही दिवसांपासून कुठल्या शहरांत कोरोनाचे रुग्ण जास्त, यावरून अप्रत्यक्षरित्या रंगलेली ही स्पर्धा सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे. 

अवघ्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ओलांडली आणि सर्वांनाचं आश्चर्याचा मोठा धक्का बसला. खरं तर देशभरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना राष्ट्रीय पातळीवर एकट्या मुंबईला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात होतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने सहाजिकच सर्वांचं लक्ष मुंबईकडे जाणं स्वाभाविकच आहे. परंतु दिल्ली, गुजरात अशा राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना महाराष्ट्र आणि त्यातही प्रामुख्याने मुंबईतील स्थितीबाबत राजकीय पातळीवरुन सातत्याने टीका-टिप्पणी सुरू होती. सर्व प्रमुख प्रसार माध्यमांमध्ये चर्चा, वाद-विवाद झडत होते. प्रशासन कोरोना रोखण्यात कसं अपयशी ठरतंय, यावर बोट ठेवलं जात होतं. अर्थात यांत केंद्रात सत्तेत आणि राज्यांत विरोधात असलेल्या नेत्यांचा मोठा वाटा होता. 

हळुहळू का होईना परंतु मुंबईतील स्थितीत बराच सकारात्मक बदल व्हायला लागला. मुंबईत दाटीवाटीच्या वस्त्यांची संख्या मोठी असल्याने कोरोना प्रादुर्भावाचा इथं मोठा धोका होता. वरळी, धारावी, दादर-माहीम अशा परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताच मुंबई महापालिका प्रशासनाने ‘चेस द व्हायरस’ उपक्रमाअंतर्गत ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली. प्रो ॲक्टिव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर्स यामुळे येथील साथ नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत झाली. उच्च जोखमीचे झोन निश्चित करून खासगी डाॅक्टरांची मदत घेण्यात आली. कंटेन्मेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्य पुरवण्यात आलं.

अशा सर्व उपक्रमांमुळे मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालिची वाढ झाली. मुंबईतील धारावी सारख्या उपक्रमाची तर जागतिक आरोग्य संस्था, अमेरिकेतील नामांकीत वृत्तपत्र वाॅशिंग्टन पोस्टने दखल घेतली आणि कौतुक केलं. एवढंच नाही, तर फिलीपाइन्स या देशाने मुंबई महापालिकेशी संपर्क साधून धारावी पॅटर्नची ब्ल्यू प्रिंट मागून घेतली आहे. हा उपक्रम ते त्यांच्याही देशात राबवणार आहेत. नाही म्हणता सध्या मुंबई उपनगरांत प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मेहनत घ्यावी लागत आहे. मास्क न घालताच बाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सार्वजनिक स्वच्छता न पाळणे अशा कोरोनाबाबतच्या नियमांचं नीट पालन होत नसल्यानेच उपनगरात कोरोनाचा फैलाव होत आहे. 

अशीच काहीशी गत पुण्याची देखील झाली आहे. पुण्यातील दाटीवाटीच्या वस्तीसोबतच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील पुणेकर कोरोनाबाबतच्या नियमांना गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. परिणामी पुण्यात अत्यंत वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांचं प्रमाणही मोठं आहे. लाॅकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथिल झाल्याने पुणे ग्रामीण भागात तर कोरोनाचं आता कुठलंही भय उरलेलं नाही, पुणं तिथं काय उणं? म्हणत लोकं बिनधास्त, मोकळेपणाने रोजचे व्यवहार करू लागलेत. बाजारांत नेहमीसारखीच गर्दी दिसून येते. जिथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होतं. तोंडावर मास्क लावलेली लोकंही अत्यंत कमी प्रमाणात दिसतात. ज्यांनी मास्क लावलेलं आहे. त्यातील बहुतेकांचं मास्क हे नाकाच्या खालीच दिसून येतं. लहान मुलं, तरूण मंडळी आणि वयस्कर हे नेहमीप्रमाणाचे बाहेर वावरताना दिसतात. अशी परिस्थिती असेल, तर पुण्यात कोरोना कमी होणार की आणखी पसरणार हे सांगायला कुणाही ज्योतिषाची गरज नाही. 

हेही वाचा- फिलीपाइन्स वापरणार धारावी पॅटर्न! महापालिकेने दिली ब्ल्यू प्रिंट

पुण्याचे पालकमंत्री, स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन सूचना करण्यात येतात. स्थानिक प्रशासनाने ठिकठिकाणी प्रयोगशाळा, कोविड रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. घरोघरी जाऊन अँटिजेन चाचण्याही करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून जनतेला सूचना देखील करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे. त्यासाठी पुणेकरांनी केवळ शिस्त पाळण्याची गरज आहे.

मुंबई आणि पुण्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर पुण्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मुंबईला किती झपाट्याने गाठलं आणि मागे टाकलं हे तुमच्या सहज लक्षात येईल. ६ मे २०२० रोजी मुंबईत १०,७१४ कोरोनाबाधित रुग्ण होते. तर ४१२ जणांचा मृत्यू झाला होता. यातुलनेत पुणे अगदीच पिछाडीवर होतं, याच तारखेला पुण्यात अवघे १८६१ कोरोनाबाधित रुग्ण होते. तर ११५ जणांचा मृत्यू झाला होता. तर संपूर्ण महाराष्ट्रात १६,७८५ कोरोनाबाधित रुग्ण होते, तर ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

यानंतर महिन्याभराने मुंबईत हीच संख्या पाचपट वाढली. १० जून २०२० रोजी मुंबईत ५२, ६६७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी १८५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर पुण्यात १०,४०६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्राने एक लाखाकडे (९४,०४१ कोरोनाबाधित रुग्ण) वाटचाल सुरू केली होती. त्यातील त्यातील निम्मे रुग्ण हे एकट्या मुंबईतील होते. याच तारखेला ३४३८ जणांचा राज्यात मृत्यू देखील झाला होता. 

१० जुलै २०२० रोजी तर खुद्द मुंबईनेच एक लाखाकडे( ९०,४६१ कोरोनाबाधित रुग्ण ) कूच केली होती. ५२०५ जणांचा मृत्यू झाला होता, तर पुणे मनपा परिसरात ३५,२३२ काेरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी १०२६ जणांचा मृत्यू झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे याच काळात ठाणेही पुण्याच्या पुढं होतं. इथे ५७,१३८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर १५३६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात याच काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाखांच्या पुढं (२,३८,४६१) गेली होती. तर ९८९३ जणांचा मृत्यू झाला होता.

१० आॅगस्ट २०२० रोजी मुंबई-पुणे-ठाणे या तिन्ही शहरांतील कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडलेला होता. परंतु पुण्याने ठाण्याला पिछाडीवर सोडून मुंबईसोबत स्पर्धा सुरू केली. या तारखेला मुंबईत १,२४,३०६ कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू ६८४५, ठाण्यात १,०५,९०४ कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यू ३०४९ तर पुण्यात १,१४,७०३ कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यू २७७१ आणि महाराष्ट्रात ५,२४,५१३ काेरोनाबाधित रुग्ण तसंच १८,०५० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

१५ आॅगस्ट २०२० रोजी पुण्याने मुंबईला गाठलं. या तारखेत मुंबईत १,२७,७१६ कोरोनाबाधित रुग्णांची आणि ७०८६ मृत्यूची नोंद करण्यात आली. तर पुण्यात १,२७,५१८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. शिवाय ३१३० जणांचा मृत्यू झाला. ठाणेही फार पाठिमागे नव्हतं. या तारखेला ठाण्यात १,१२,६३८ कोरोनाबाधित आणि ३३०० मृत्यूची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात हाच आकडा ५,८४७५४ कोरोनाबाधित रुग्ण आणि १९,७४९ इतका होता.

१६ आॅगस्ट २०२० रोजी अखेर पुण्याने मुंबईला पिछाडीला टाकलंच. या तारखेला मुंबईत बाधित रुग्ण- (१,२८,७२६) बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६८), मृत्यू- (७१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,८२५) इतके होते. तर पुणे: बाधित रुग्ण- (१,३०,६०६), बरे झालेले रुग्ण- (८६,३९३), मृत्यू- (३१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०२०) पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही मुंबईच्या दुपटीहून अधिक होती. तर ठाण्यात बाधित रुग्ण- (१,१३,९४४), बरे झालेले रुग्ण- (९०,३२६), मृत्यू (३३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,२८८) आणि महाराष्ट्रात एकूण बाधित रुग्ण-(५,९५,८६५) बरे झालेले रुग्ण-(४,१७,१२३),मृत्यू- (२०,०३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५८,३९५) इतकी नोंद करण्यात आली.

२३ आॅगस्ट २०२० रोजीत मुंबईत बाधित रुग्ण- (१,३५,३६२) बरे झालेले रुग्ण- (१,०९,३६८), मृत्यू- (७३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,३०१)

पुणे: बाधित रुग्ण- (१,४७,६७१), बरे झालेले रुग्ण- (१,००,५००), मृत्यू- (३६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३,४९७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२१,६३०), बरे झालेले रुग्ण- (९७,४९१), मृत्यू (३५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,६०१)

महाराष्ट्रात एकूण बाधित रुग्ण-(६,७१,९४२) बरे झालेले रुग्ण-(४,८०,११४),मृत्यू- (२१,९९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,६९,५१६) इतकी नोंद करण्यात आली. 

पुणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ही अंदाजे १ ते सव्वा कोटीच्या आसपास असू शकेल तर मुंबईची लोकसंख्याही सव्वादोन कोंटीच्या आसपास असेल. परंतु क्षेत्रफळाचा विचार करता पुणे जिल्ह्यातील घनता ही मुंबईच्या तुलनेत बरीच कमी आहे. तर मुंबई हे दाटीवाटीचं शहर म्हणून ओळखलं जातं. नाही म्हणता पुण्यातही दाट लोकवस्ती असलेले परिसर वाढू लागले असले, तरी मुंबईच्या झोपडपट्ट्यांची तुलना ही इतर कुठल्याही महानगराशी होऊ शकत नाही. असं असूनही मुंबईच्या तुलनेत पुण्यात असलेली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. पुणेकरांनी स्वत:च आणि कुटुंबियांचं आरोग्य जपण्याच्या दृष्टीने सजग होणं, सावधगिरी बाळगणं आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेऊन शिस्त पाळणं खूपच गरजेचं आहे. सध्या तरी पुण्यातील मृत्यूदर हा मुंबईच्या तुलनेत बराच कमी आहे, एवढाच काय तो दिसाला म्हणता येईल. एरवी तावातावाने भांडणारे पुणे-मुंबईकर या विषयावर मान वर करून अभिमानाने बोलू शकतील काय? याचाही प्रत्येकाने विचार करायला हवा.

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा