Advertisement

एकरकमी १२ कोटी लस विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे पासून राज्यात देखील १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

एकरकमी १२ कोटी लस विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी- उद्धव ठाकरे
SHARES

महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे पासून राज्यात देखील १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिली. परंतु सद्यस्थितीत लसींचा साठा अत्यंत मर्यादीत असल्याने त्याच प्रमाणात हे लसीकरण होईल. तोपर्यंत सर्वांनी संयम बाळगावा, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल जनतेला माहिती दिली. ते म्हणाले, येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही राज्यांवर टाकण्यात आलेली आहे. तशी जबाबदारी आपण समर्थपणे पेलली आहे. राज्यात १८ वर्षे ते ४४ वर्षे या वयोगटासाठी मोफत लसीकरण करण्याची घोषणा राज्य सरकारने याआधीच केली आहे. तर ४५ पुढील नागरिकांसाठी केंद्राकडून लस पुरवठा सुरूच राहील.

हेही वाचा- लसीकरणासाठी २२७ केंद्रे सुरू करण्याची बीएमसीची योजना

लसीचा मर्यादीत साठा

मात्र सध्याच्या स्थितीत आपल्याकडे ४५ वयापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी अत्यंत मर्यादीत साठा केंद्राकडून मिळत आहे. त्यातच आपल्याला १८ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरणही करायचं आहे, त्याकरीता देखील आणखी लस लागणार आहे. पण देशात कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करणाऱ्या केवळ दोनच कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांशी आपण संपर्क साधलेला आहे. परंतु या दोन्ही कंपन्यांना लस उत्पादनाच्या मर्यादा आहेत. या कंपन्यांना एकूण उत्पादनापैकी ५० टक्के साठा केंद्राला, तर उरलेल्या ५० टक्क्यांपैकी विविध राज्यांना आणि खासगी संस्थांना द्यायचा आहे. हे लक्षात घेता आपण इतर कंपन्यांशी बोलण्याची तयारीही ठेवलेली आहे. 

एकरकमी लस विकत घेण्याची तयारी

आपल्याकडे १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६ काेटी लोकसंख्या आहे. या सर्वांना लशीचे दोन्ही डोस द्यायचे झाल्यास आपल्याला किमान १२ कोटी डोस लागणार आहेत. आपण दिवसाला ५ लाख लोकांचं लसीकरण करत असून ही क्षमता दिवसाला १३ लाखांपर्यंत नेण्याची आपली तयारी आहे. राज्याला आर्थिक चणचण भासत असली, तरी नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्याकरीता संपूर्ण १२ कोटी डोस विकत घेण्यासाठी आवश्यक एकरकमी रक्कम देण्याचीही आपली तयारी आहे. परंतु देशात लसीचा साठाच नसल्याने त्याला मर्यादा येत आहेत.

त्यामुळे केंद्राकडून आपल्याला जास्तीत जास्त लस मिळावी, अशी आपली मागणी राहणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे १८ ते ४४ वयोगटासाठी उपलब्ध असलेले ३ लाख डोस देण्यास आपण १ मे पासून सुरू करणार आहोत. हे डोस कमी आहेत, हे मान्य असलं, तरी जसजसे डोस येतील, तसंतसं लसीकरणाचं नियोजन करण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

(covid 19 vaccination will start for 18 to 44 age group in maharashtra from 1st may says uddhav thackeray)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा