Advertisement

एसटीच्या चालक-वाहकांच्या लसीकरणाची मागणी


एसटीच्या चालक-वाहकांच्या लसीकरणाची मागणी
SHARES

कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा पुरवली. त्यामुळं, कोरोनाच्या कठीण काळात वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यातील एसटी चालक-वाहकांचेही लसीकरण करावे, अशी मागणी एसटी महामंडळानं राज्य सरकारकडे केली आहे.

लॉकडाऊनमध्ये राज्यात अडकलेल्या परप्रांतिय कामगारांच्या वाहतुकीची जबाबदारी रेल्वेबरोबरच एसटीनं उचलली. पाठोपाठ सर्वसामान्यांसाठी आधी जिल्हांतर्गत आणि मग राज्यांतर्गत वाहतूक सुरु झाली. ही सेवा देताना सुरुवातीपासूनच महामंडळाच्या चालक-वाहकांबरोबरच यांत्रिकी कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचारी, अधिकारी कार्यरत होते.

आतापर्यंत कोरोनामुळे १०५ कर्मचारी दगावले असून यामध्ये बहुतांश चालक-वाहकांचा समावेश आहे. सध्या एसटीत ३४ हजार चालक आणि २९ हजार वाहक आहेत. यापैकी मुंबई महानगरात दररोज होणाऱ्या १५०० एसटी फेऱ्यांवर २ हजार चालक-वाहक कार्यरत आहेत. शिवाय मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सेवेसाठी असलेल्या १ हजार एसटी गाड्यांवर ४ हजार चालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी करोना रुग्णसंख्या जास्त होती, अशा मुंबई महानगरातही चालक-वाहकांची आपले कर्तव्य पार पाडत आहे.

मागील ९ महिने कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांचा कोरोनाविरोधी आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरण मोहिमेत समावेश करावा, अशी मागणी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.

एसटी महामंडळाचे राज्यात ३ हजार ९७८ अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले, यातील १०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या २५५ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत झालेल्या ८ कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा