Advertisement

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष - कामाच्या तणावात जातंय निम्म आयुष्य!


जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष - कामाच्या तणावात जातंय निम्म आयुष्य!
SHARES

स्पर्धात्मक जीवनामुळे नोकरदारांची धावपळ दसपटीने वाढलीय. या धावपळीचा ताण शरीरावर तर येतोच, पण मानसिक ताणातही कित्येक पटीने भर पडते. आज मिटींग, उद्या प्रेझेंटेशन अशा सर्वच प्रकारच्या तणावातून आपण दररोज जात असतो.

घरच्या टेंशनसोबत लढत असताना कामाचं टेंशन एवढं वाढतं की, त्यातून कधी-कधी वेळही मिळत नाही. याचीच दखल घेत 'जागतिक मानसिक आरोग्य दिना'निमित्त 'डब्लूएचओ'ने म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने देखील यावर्षी ‘कामाच्या ठिकाणचं मानसिक स्वास्थ’ ही थीम निवडली आहे.

जगभरातील मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल कमी असलेली जागरुकता वाढवण्यासाठी आणि ज्यांना मानसिक आजार आहे, त्यांच्याकडे त्यांच्या कामाच्या ठिकाणचा बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी ही थीम यावर्षी निवडण्यात आली आहे.

आपण दररोज अनेक प्रकारच्या मानसिक तणावातून जात असतो. पण, यावर वेळीच योग्य उपचार किंवा संवाद साधला नाही, तर हा आजार कायमस्वरूपी आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो.


कशामुळे येतो मानसिक ताण -

  • कमी पगारामुळे
  • जास्त कामाचा ताण
  • प्रगतीसाठी कमी संधी
  • मनाला हवं तसं काम न करता येणं
  • नोकरीसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर नियंत्रण नसणं
  • कामासंदर्भातील वाढत्या मागण्या, अपेक्षा

 




डॉक्टरांनाही येतो मानसिक ताण

मानसिक तणावापासून खुद्द डॉक्टरही वाचलेले नाहीत. रोज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांचं दैनंदिन आयुष्य सुरू होतं. सतत दोन- दोन दिवस डॉक्टर काम करतात. एखादं इमर्जन्सी ऑपरेशन असेल, तर त्यातही मागे-पुढे न बघता ते ती परिस्थिती हाताळतात. डॉक्टरांच्या मानसिक तणावाविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी बऱ्याच बाबी ‘मुंबई लाइव्ह’सोबत शेअर केल्या.

डॉक्टरांना सर्वात जास्त ताण असतो तो म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिसचा. त्यानंतर, एखादा रुग्ण उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर तो बरा होईपर्यंत किंवा त्याला येणाऱ्या अडचणी या सर्व परिस्थितीला डॉक्टरांना सामोरं जावं लागतं. एका वेळी 100 गोष्टींचा विचार डॉक्टर करत असतात. रुग्णाच्या नातेवाईकाला जेवढा ताण येतो, तेवढाच ताण डॉक्टरांवर येतो. बऱ्याचदा डॉक्टरांना आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता येत नाही.  त्याचीही चिडचिड होते. 

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय 


'पोलिसही जगतात तणावाखाली' हे कितपत खरं?

पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कामाचा तणाव असतो. मग, ते खाकी वर्दीतील असोत किंवा ट्रॅफिक पोलिस असोत. पोलिसांसाठी 24 तास अलर्ट राहून काम करणं हेच सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. याविषयी ‘मुंबई लाइव्ह’ने माजी सह पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पोलिसांमध्ये कशा प्रकारचे ताण असतात? याचं स्पष्टीकरण दिलं.


जर एखाद्या पोलीसाला भ्रष्टाचार करण्याची सवय असेल आणि त्यातून पैसे खायचे असतील, तर त्याला त्यामधूनही मानसिक ताण येऊ शकतो. पोलिसांमध्येही 3 प्रकार असतात. भ्रष्टाचारी, प्रामाणिक आणि तिसरे म्हणजे परिस्थितीनुसार वागणारे. त्यामुळे आपण आपलं काम कशा पद्धतीने करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे.

 -सुधाकर सुराडकर, माजी सह पोलीस आयुक्त, मुंबई

पोलिसांना मानसिक तणाव असतो यात शंका नाही. पण, तो कुठल्या आणि कशा प्रकारचा आहे? हे स्वत: पोलिसांनी तपासून बघितलं पाहिजे, असा सल्लाही सुराडकर यांनी दिला आहे.



पत्रकार 24 तास ऑन ड्यूटी

पूर्वीची आणि आताची पत्रकारिता पाहाता बराच बदल झालेला आढळतो. पूर्वी वृत्तपत्र मर्यादित होते. काम जरी संथ असले, तरी त्याचा तेवढा ताण पडत नव्हता. पण, आता पद्धत पूर्णपणे बदलली. बातम्या पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी टीव्ही आणि वेबसाईट्स एवढ्या आहेत की प्रत्येक क्षणाला अपडेट रहावं लागतं. त्यामुळे कदाचित आताच्या पत्रकारांना मानसिक तणाव जास्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच बदललेल्या पत्रकारीतेतील तणावाविषयी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांच्याशी ‘मुंबई लाइव्ह’ने बातचित केली असता, त्यांनी पत्रकारांवरच्या ताणाविषयी भूमिका मांडली.

सगळ्याच गोष्टी वेळेत सुरू झाल्या पाहिजेत आणि त्या वेळेत संपल्याही पाहिजेत हा समज असतो. आजचा जमाना ब्रेकिंग न्यूजचा आहे. स्पर्धा वाढली आहे. मी बातमी देण्याआधी कोणी ती बातमी देऊ नये याचा प्रचंड ताण असतो. शिवाय ती बातमी 100 टक्के खरी असली पाहिजे, याचाही ताण असतो. त्यामुळे पत्रकारांना 24 तास कान-डोळे उघडून काम करावं लागतं. एवढं काम करुनही जर वेळेवर पगार होत नसेल तर त्याचा ही मानसिक ताण येतो.  

-योगेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार

मानसिक तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यासाठीच मानसिक स्वास्थ हे महत्त्वाचं आहे.



हेही वाचा -

गतिमान जीवनशैलीमुळे येते नैराश्य?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा