Advertisement

सरकारी डाॅक्टरांनो सावधान... खासगी प्रॅक्टीस केल्यास नोंदणी रद्द

वरकमाईच्या हव्यासापायी खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस करणाऱ्या डाॅक्टरांची आता खैर नाही. कारण अशी बेकायदा प्रॅक्टीस करताना आढळल्यास त्या डाॅक्टरची थेट नोंदणीच रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने घेतल्याची माहिती संचालनालयाचे संचालक डाॅ. प्रविण शिनगारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

सरकारी डाॅक्टरांनो सावधान... खासगी प्रॅक्टीस केल्यास नोंदणी रद्द
SHARES

सरकारी रूग्णालयात कार्यरत असताना संबंधित रूग्णालयात सेवा न देता वरकमाईच्या हव्यासापायी खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस करणाऱ्या डाॅक्टरांची आता खैर नाही. कारण अशी बेकायदा प्रॅक्टीस करताना आढळल्यास त्या डाॅक्टरची थेट नोंदणीच रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने घेतल्याची माहिती संचालनालयाचे संचालक डाॅ. प्रविण शिनगारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


रंगेहाथ पकडलं

सरकारी डाॅक्टर सरकारी रूग्णालयात न येता बेकायदेशीरित्या खासगी प्रॅक्टीस करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एकीकडे रूग्णसेवा विसरत सरकारला चुना लावायचा आणि दुसरीकडे भरमसाठ वरकमाई करायची, असा मनमानी कारभार काही सरकारी डाॅक्टरांकडून सर्रासपणे सुरू असतो. या धर्तीवर संचालनालयाने मुंबईसह राज्यभर अशा डाॅक्टरांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत यवतमाळ येथील २ तर नागपूरमधील एका डाॅक्टरला खासगी प्रॅक्टीस करताना रंगेहाथ पकडलं आहे.


कठोर कारवाई हवीच

सरकारी रूग्णालयात कधी तरी यायचं, नाही तर फक्त पगार घ्यायलाच यायचं, असे गैरप्रकार या डाॅक्टारांकडून सुरू होते. तर सरकारी रूग्णालयातील डाॅक्टरांना खासगी रूग्णालयात उपचारांसाठी बोलवत त्यांची आर्थिक लूट करायची, असेही प्रकार आढळून आले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या डाॅक्टरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि असे प्रकार कायमचे रोखावेत यासाठी डाॅक्टारांची नोंदणी रद्द करण्याचा कठोर निर्णय संचालनालयाने घेतल्याचं डाॅ. शिनगारे यांनी स्पष्ट केलं आहे.


नोंदणी का महत्त्वाची?

याआधी अशा डाॅक्टरांना केवळ निलंबित केलं जात असल्याने डाॅक्टरांचं फावत होतं. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणीच आता रद्द करण्यात येणार आहे. खासगी असो वा सरकारी डाॅक्टरकी करण्यासाठी कौन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे, नोंदणी नसल्यास डाॅक्टरकी करता येत नाही. आता ही नोंदणीच रद्द झाली तर दोषी डाॅक्टरांना प्रॅक्टीसच करता येणार नाही. अशा कडक कारवाईमुळे सरकारी डाॅक्टरांमध्ये कायद्याची आणि कारवाईची भिती निर्माण होईल. त्यामुळेच नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


नोटीस बजावली

या निर्णयानुसार यवतमाळ आणि नागपूरमधील ३ डाॅक्टरांची नोंदणी रद्द करण्याबाबत मेडिकल कौन्सिलला संचालनालयाकडून पत्र पाठवण्यात आलं होतं. त्या पत्रानुसार कौन्सिलने या डाॅक्टरांना नोंदणी रद्द करण्याबाबतची नोटीस बजावल्याचं डाॅ. शिनगारे यांनी सांगितलं. यापुढे जे डाॅक्टर बेकायदा खासगी प्रॅक्टीस करताना आढळतील त्यांच्याविरोधात अशीच कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा