Advertisement

डाएट फराळ तयार करायचाय? मग हे वाचा...


डाएट फराळ तयार करायचाय? मग हे वाचा...
SHARES

खरंतर डाएटची गरज त्या लोकांना असते, ज्यांचं वजन खूप वाढलेलं असतं. पण, जर तुम्ही डायबेटिक आहात किंवा जास्त तणावाखाली असाल, तर तुम्हालाही डाएट केल्याचा फायदा नक्की होऊ शकतो. पण, दिवाळी म्हटलं की गोड, तिखट, चमचमीत खाणं आलंच! याचा त्रास आपल्याला आता नाही, तर काही दिवसांनंतर जाणवायला सुरुवात होते. पण हा त्रास होऊ नये, त्यासाठी आपण आधीच काळजी घेऊ शकतो.

यासाठी आपण घरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या फराळात काही बदल करु शकतो. त्यापासून आपलं आरोग्यही चांगलं आणि सुदृढ राहील.

फराळात आपण मुख्यत: पाच पदार्थ बनवतो. लाडू, चकली, शंकरपाळी, शेव आणि चिवडा...पण, हे पदार्थही आपण डाएट फराळासारखे बनवू शकतो. याविषयी 'मुंबई लाइव्ह'ने डाएटिशियन अंकिता घाग यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी घरच्या घरी डाएट फराळ कसा बनवू शकतो? याचा सल्ला दिला.  

डाएट करणाऱ्यांसाठी तळलेल्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ जास्त उपयुक्त ठरतील, असा सल्लाही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला.

  1. पोह्यांचा चिवडा - डाएट चिवडा बनवण्यासाठी पोहे आधी भाजून घ्यावेत. अगदी थोड्याशा तेलात शेंगदाणे, काजू, चण्याची डाळ, तीळ आणि मनुके भाजून घ्यावेत. हे सर्व मिश्रण भाजलेल्या पोह्यात मिक्स करावं. या मिश्रणात चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर घालावी. थोड्याशा तेलात मिरचीचे तुकडे, हळद आणि कडीपत्ता भाजावा. पोह्यांचं मिश्रण यात मिक्स करावं. जर आणखी थोडा डाएट चिवडा तयार करायचा असल्यास त्यात थोडे ओट्सही घालू शकता.
  2. शेव - शेवसाठी जे मिश्रण तयार केलं जातं, त्या मिश्रणाला चांगलं खरपूस भाजून घ्यावं. किंवा सोया शेव ही तुम्ही तयार करु शकता. प्रमाणानुसार बेसन, हळद, हिंग, लिंबाचा रस, पावडर साखर, तेल, चवीनुसार मीठ या संपूर्ण मिश्रणाला चांगलं मिक्स करुन भाजावं. तेलात तळू नये. म्हणजे तुम्हाला डाएट शेव खाता येईल.
  3. शंकरपाळी - शंकरपाळीचं पीठ मळताना त्यात थोडंसं तेल घालावं. म्हणजे शंकरपाळी भाजूनही चांगल्या खरपूस लागतात.
  4. चकली - चकलीच्या मळलेल्या पीठात थोडंसं तेल घालावं. म्हणजे ती भाजताना खरपूस भाजली जाईल. त्यात असलेल्या तिळामुळे शरीराला फायबर मिळतं. त्यामुळे ते आवर्जून घालावं. शिवाय, थोडा कडीपत्ता घालावा. त्यामुळे डाएबेटिस असलेल्यांना चकलीचा त्रास होणार नाही.
  5. लाडू - थोडंसं गोड म्हणून आपण आवडीने लाडू खातो. पण, हा लाडू खजूर, बदाम, अक्रोड, कोकोपावडरपासून बनवाल, तर तो जास्त पौष्टिक बनू शकतो. शिवाय, यात ओट्स देखील घातले, तरी तो आणखी पौष्टिक बनेल. हा लाडू डाएबेटिक, किडनीचे आजार असलेले किंवा अॅनेमिया असणारे ही खाऊ शकतात. पण, लाडूचा आकार छोटा असावा.

वरील सर्व पदार्थ हे प्रमाणात खाल्ले, तर तुमच्या शरीरात कॅलरीजचं प्रमाण समतोल राहील. त्यासोबतच जर 15 ते 20 मिनिटं वॉक केलंत, तर जेवढी कॅलरी तुम्ही शरीरात घेतली असेल, ती घामाद्वारे बाहेर पडेल. म्हणून दिवाळीच्या मूडमध्ये थोडंसं चालणं ही फार महत्त्वाचं ठरेल.



हेही वाचा

कधीकाळी अशी होती आमची दिवाळी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा