डॉक्टरांनो सावधान... औषध कंपन्यांकडून महागडी गिफ्ट घ्याल तर फसाल

 Mumbai
डॉक्टरांनो सावधान... औषध कंपन्यांकडून महागडी गिफ्ट घ्याल तर फसाल

मुंबई - औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना महागड्या-महागड्या भेटवस्तु दिल्या जातात. कधी रोख रक्कम ही दिली जाते. इतकेच नव्हे तर हवाई सफर, क्रुझ सफर, विदेशी टुर ही मोफत करवून दिल्या जातात. यापुढे मात्र डॉक्टरांची ही चंगळ कायमची बंद होणार आहे. कारण केंद्र सरकारने आता फार्मासिट्युकल मार्केटींग प्रॅक्टीसेस या कायद्याअंर्तगत नवीन कडक नियम केला आहे. त्यानुसार आता डॉक्टरांना 1000 रुपये किंमतीपर्यंतच्याच भेटवस्तु स्वीकारता येणार आहे. 1000 पेक्षा महागड्या वस्तु देणाऱ्या कंपन्यांंविरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे. तर महागड्या वस्तु स्वीकारणाऱ्या डॉक्टरांंनाही यापुढे कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलचे नवनियुक्त सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

आपल्याच कंपनीची औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत, आपल्या कंपनीच्या औषधांना प्रमोट करावे यासाठी कंपन्या डॉक्टरांना अशा महागड्या भेटवस्तु देत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. जेनरिक औषधांचा वा स्वस्त औषधांचा पर्याय असतानाही केवळ डॉक्टरांकडून ठराविक कंपनीचीच औषधे लिहून दिली जात असल्याने रूग्णांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्याही तक्रारी होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सरकारने नवा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उत्तुरे यांनी स्वागत करत या कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी केली आहे. दरम्यान, या कायद्याचा अध्यादेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

या नव्या कायद्यानुसार यापुढे 1000 रुपयांपेक्षा महागडी भेटवस्तु स्वीकारणाऱ्या दोषी डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची तरतुद आहे. तर कंपन्यांचाही परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे गिफ्ट देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवरही कारवाई होणार असल्याने अशा गैरप्रकारांना नक्कीच आळा बसेल असेही उत्तुरे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments