Advertisement

१२ तासांची शस्त्रक्रिया..आणि दोघांचा पुनर्जन्म!

जन्मत:च अंग जोडलेली असलेल्या दोन जुळ्या मुलांची अर्थात सयामी मुलांची काळजी घेणारे शीतल आणि सागर झाल्टे. शीतल २४ आठवड्यांची गर्भवती असतानाच नौरोसजी वाडिया मेटर्निटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला या सयामी मुलांबद्दल सांगितलं. हे ऐकून दोघे कोलमडून पडले.

१२ तासांची शस्त्रक्रिया..आणि दोघांचा पुनर्जन्म!
SHARES

"या दोघांचा जन्म झाला तेव्हा त्यांची शरीरं जोडलेली होती. आधी डॉक्टरांनी माहिती दिली असूनही तेव्हा थोडं दडपण आलं. त्यांची खूप काळजी घ्यावी लागत होती. पण डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे आज खूप आनंद होत आहे!"

ही प्रतिक्रिया आहे अवघ्या १ वर्ष ३ महिन्यांच्या लव आणि प्रिन्सची आई शीतल झाल्टे यांची!
१२ डिसेंबरला परेलच्या बाई जिजाबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत किचकट शस्त्रक्रिया पार पडली आणि लव आणि प्रिन्स एकमेकांपासून वेगळे झाले!


सयामी बाळांच्या पालकांचा कणखरपणा...

जन्मत:च अंग जोडलेली असलेल्या दोन जुळ्या मुलांची अर्थात सयामी मुलांची काळजी घेणारे शीतल आणि सागर झाल्टे. शीतल २४ आठवड्यांची गर्भवती असतानाच नौरोसजी वाडिया मेटर्निटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला या सयामी मुलांबद्दल सांगितलं. हे ऐकून दोघे कोलमडून पडले. पण हॉस्पिटलमधल्या स्टाफ आणि डॉक्टरांनी त्यांची समजूत काढली. आणि अखेर या सयामी बाळांना जन्म घ्यायचा निर्णय झाल्टे दाम्पत्यानं घेतला.


२० डॉक्टरांच्या टीमने केली शस्त्रक्रिया

१९ सप्टेंबर २०१६रोजी शीतलनं सयामी बाळांना जन्म दिला. त्यानंतर वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांची एक टीम कामाला लागली. या दोघांची केस डॉक्टरांनी व्यवस्थित अभ्यासली! आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचं यकृत, आतड्या आणि मूत्राशयाचा भाग जोडलेला होता. एवढी क्लिष्ट सर्जरी करण्यासाठी २० डॉक्टरांच्या पूर्ण टीमने तब्बल १२ तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये भाग घेतला होता.


प्रिन्स आणि लववरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यांची प्रकृति आता स्थिर आहे. अजून काही दिवस त्यांना निगराणीमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अजून काही सर्जरी करण्यात येतील. या शस्त्रक्रियेमधला सर्वात आव्हानात्मक भाग होता तो म्हणजे या दोघांच्या नव्याने वेगळ्या झालेल्या अवयवांना त्वचा पुरवणं.

डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया हॉस्पिटल


...आणि ते समाधान पावले!

या शस्त्रक्रियेमुळे प्रिन्स आणि लव यांचा जणू पुनर्जन्मच झाल्याची भावना त्यांच्या पालकांच्या डोळ्यांमध्ये अगदी सहज दिसत होती. आणि दुसऱ्यांदा अशा प्रकारची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केल्याचं समाधान वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. याआधी रिद्धी आणि सिद्धी या दोघी सयामी बहिणींवर वाडियामध्ये अशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा