वजन कमी झालं तरी इमान चालू शकणार नाही

  Charni Road
  वजन कमी झालं तरी इमान चालू शकणार नाही
  मुंबई  -  

  इजिप्तहून बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत आलेल्या इमान अहमद (36) हिच्या पायाचे स्नायू अशक्त असल्यामुळे तिला भविष्यात चालता येणार नाही, असं सैफी रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात इजिप्तहून क्रेनच्या सहाय्याने इमानला मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर तिला उपचारासाठी सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेली 25 वर्षे इमान अंथरुणाला खिळली होती. त्यात तिच्या उजव्या शरीराला अर्धांगवायूचा झटका आल्याने पायांचे स्नायू कमकुवत झाले असल्याचे सैफी रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

  शुक्रवारी इमान अहमदला विशेष खोलीतून हलवण्यात आले. सध्या इमान सैफी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील खोलीत राहत आहे. दोन महिन्यांपूर्वी इमानचे वजन 498 किलो होते. ते आता 250 किलोपर्यंत पोहोचले आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या फिजिओथेरपी आणि औषधांमुळे तिचे वजन झपाट्याने कमी होत आहे. सध्या इमानचा थायरॉईड आजार नियंत्रणात आहे, तसंच तिचे मूत्रपिंडही व्यवस्थित काम करीत आहे. इमानचे वजन कमी करण्यासाठी 60 टक्के उपचार पूर्ण झाले आहेत. पण, अजूनही तिच्या मज्जासंस्थेसंदर्भातील उपचार सुरू आहेत, असं डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितले. 

  सध्या ती पाठ टेकून बसू शकते. वयाच्या 11 व्या वर्षी तिला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यात तिच्या पायाच्या स्नायूंचे बळकटीकरण झाले नाही. या कारणाने यापुढे इमान केव्हाच चालू शकणार नाही. मात्र असे असले तरी इमान इजिप्तला जाताना स्वत: बसू शकेल, असा विश्वास डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी व्यक्त केला आहे. तसंच तीचं आणखी 50 किलो वजन कमी झालं, तर तिच्या मज्जासंस्थेसंदर्भात उपचार करणे शक्य होणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच इमानला इजिप्तला परत जाता येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.