Advertisement

अमूलच्या नावाखाली बनावट बटरची विक्री; ठाण्यात एफडीएची कारवाई

एफडीएच्या ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी घोडबंदर इथल्या राघव इंटरप्रायझेस कंपनीवर छापा टाकला. या छाप्यात अमूल बटर या ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाच्या पाकीटात या कंपनीमध्ये तयार केलेलं बनावट बटर पॅकिंग केलं जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.

अमूलच्या नावाखाली बनावट बटरची विक्री; ठाण्यात एफडीएची कारवाई
SHARES

एक पावभाजी बटर मारके अशी आॅर्डर अनेकजण पावभाजीच्या स्टाॅलवर वा हाॅटेलमध्ये देतात. तर बटर पावभाजीबरोबरच बटर सॅण्डवीच, बटर पनीर, बटर चिकन, बटर रोटी, ब्रेड बटर असं एक ना अनेक बटरच्या पदार्थांवर ताव मारायला कुणाला आवडत नाही? बटर म्हणजे अनेकांचा वीक पाॅईंट. 

पण आता यापुढं बटर खाताना वा बटर मारके म्हणताना मुंबईकरांनो थोडी काळजी घ्याच. कारण तेल, तुपानंतर आता बाजारात बनावट, भेसळयुक्त बटर विक्रीसाठी ठेवलं जात आहे. तर हेच बनावट-भेसळयुक्त बटर स्टाॅल, ठेले, हाॅटेल इतकंच नव्हे तर पंचतारांकित हाॅटेलमध्येही वापरलं जात असल्याची शक्यता आहे. कारण अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या घोडबंदर येथील कारवाईत जे बनावट-भेसळयुक्त बटर जप्त करण्यात आलं आहे त्यात अमूल या ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट बटरचा समावेश आहे.


राघव इंटरप्रायझेसवर छापा 

एफडीएच्या ठाणे विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी घोडबंदर इथल्या राघव इंटरप्रायझेस कंपनीवर छापा टाकला. या छाप्यात अमूल बटर या ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाच्या पाकीटात या कंपनीमध्ये तयार केलेलं बनावट बटर पॅकिंग केलं जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याची माहिती ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हला दिली आहे. अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन या कंपनीकडून केलं जात असल्याचं तसंच ग्राहकांची फसवणूक करत ग्राहकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचं या कारवाईतून समोर आलं आहे. 


२५६६ किलो बटर नष्ट

 एफडीएनं या कंपनीचं शटर डाऊन केलं आहे. तर या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस पुढील तपास करत असून एफडीएनं बटरचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठवल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या कंपनीतून सुमारे २५६६ किलोचं बनावट बटर, अमूलची ३०० रिकामी पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. हे बटर नष्ट करण्यात अालं अाहे. या बटरची एकूण किंमत ४ लाख ८१ हजार १६० रुपये अशी आहे.  तेव्हा ग्राहकांनो बटर खरेदी करताना वा बटरचे अन्नपदार्थ खाताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे.


अमुलही कारवाई करणार

एफडीएनं राघव एंटरप्रायझेसचा परवाना त्वरीत रद्द केला असून आता अमूल कंपनीकडूनही राघव एंटरप्रायझेसविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील सुत्रांनी दिली आहे. अमूलच्या नावाचा वापर करत ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्यानं अमूल कंपनीसाठी ही महत्त्वाची आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे अमूल कंपनीकडूनही लवकरच राघव एंटरप्रायझेसविरोधात काशिमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा - 

विद्यावेतनासाठी नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन

जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा शुक्रवारी रास्ता रोको




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा