अखेर सर्व सामान्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. लवकरच कोरोना लस सर्व सामान्यांना देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेनं तयारी सुरू केली आहे. जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात होणार असल्याची आशा सर्वांना आहे.
यासाठी कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी ५०० पथकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पहिले लसीकरण केंद्र कूपर रुग्णालयात उभारण्यात येत आहे. तसंच नियुक्त केलेल्या ५०० पथकांचं प्रशिक्षणही गुरुवारपासून सुरू झालं आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेच्या कूपर, नायर, लो. टिळक आणि केईएम रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्यक्ष लसीकरण केंद्र कसे असावे याची आखणी आणि नियोजन पालिकेनं सुरू केली आहे. याकरिता एक आदर्श नमुना म्हणून लसीकरण केंद्र कूपरमध्ये उभारण्यात येत आहे.
कूपरमधील या केंद्रात लसीकरणासाठी आलेल्यांकरिता प्रतीक्षालय असेल. दुसऱ्याकक्षात प्रत्यक्ष लसीकरण केलं जाईल. तर तिसऱ्या कक्षात लस दिलेल्या व्यक्तींना काही काळ वैद्यकीय देखरेखीसाठी ठेवलं जाईल. हे केंद्र पुढील दोन ते तीन दिवसांत तयार होत असून लसीकरणाची चाचणी घेतली जाईल.
लसीकरणामुळे काही अडचणी येत आहेत का हे लक्षात येईल, त्यानुसार सुधारणा करण्यात येतील. तसेच एकदा हे केंद्र उभे राहिल्यानंतर अन्य तीन रुग्णालयांमध्येही याच धर्तीवर केंद्राची उभारणी करण्यात येईल.
लस देण्यासाठी कार्यरत ५०० पथकांचे प्रशिक्षण गुरुवारपासून सुरू झाले. केंद्रीय आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण पूर्ण केलेले युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम(यूएनडीपी) आणि पालिकेचे अधिकारी असे आठ तज्ज्ञ हे प्रशिक्षण देणार आहेत.
लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी केलेल्या अॅपचा वापर कसा करावा? यातून लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख कशी पटवावी? या माहितीची नोंद कशी करावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हेही वाचा