Advertisement

मुंबईत वैद्यकीय सेवा पुरवणार ५ फिरते दवाखाने

शहरांमधील दाट लोकवस्तीत आणि ग्रामीण दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय फिरते दवाखाने चालवण्यात येणार आहेत. या फिरत्या दवाखान्यांमध्ये रक्त-लघवी तपासणी, उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार, संदर्भसेवा, कुटुंबनियोजन, प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात माता व बालसंगोपन या सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

मुंबईत वैद्यकीय सेवा पुरवणार ५ फिरते दवाखाने
SHARES

राज्यातील दुर्गम भागासह शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे. फिरते वैद्यकीय उपचार केंद्र (Mobile Medical Unit) म्हणून ओळख असणाऱ्या १० फिरते वैद्यकीय दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या फिरत्या वैद्यकीय दवाखान्याचं शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या १० फिरत्या वैद्यकीय वाहनांपैकी ५ वाहनं मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सेवा देणार असून यातील सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.


शहरांमधील दाट लोकवस्तीत आणि ग्रामीण दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत हे फिरते दवाखाने चालवण्यात येणार आहेत. या फिरत्या दवाखान्यांमध्ये रक्त-लघवी तपासणी, उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार, संदर्भसेवा, कुटुंबनियोजन, प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात माता व बालसंगोपन या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या लसीकरण, साथीचे रोग नियंत्रणात्मक कार्यक्रम, समुपदेशन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी, आरोग्य व परिसर स्वच्छता याबाबत लोकजागृतीही करण्यात येणार आहे.


मोफत वैद्यकीय सेवा

या अभियानांतर्गत १० फिरते दवाखाने कार्यरत असणार असून त्यातील मुंबईत पाच युनिट गाड्या धावणार आहेत. तर नागपूर, नांदेड, औरंगाबाद, नवी मुंबई-पनवेल आणि कोल्हापूर या शहरांमध्ये प्रत्येकी एक मोबाईल मेडिकल युनिट गाड्या धावणार आहेत.

या अभियानात वैद्यकीय सुविधांचा अभाव असणारी व साधारणपणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वस्त्यांची निवड करण्यात आली आहे. अशा निवड करण्यात आलेल्या परिसरात मोबाईल मेडिकल युनिट भेट देऊन तिथल्या गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. दरम्यान या प्रत्येक मोबाईल युनिटमध्ये एक डॉक्टर, एक नर्स, एक लॅब टेक्निशियन, एक फार्मासिस्ट, एक वाहनचालक असा कर्मचारी वर्ग कार्यरत असणार आहे.

राज्यात आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यात येत असल्यानं बालमृत्यू दर १९ वर आला असून तो आणखी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय कर्करुग्णांसाठी सर्व सिव्हिल रुग्णालयात केमोथेरपीची मोफत सेवा पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्व मानसिक रोगींसाठी मेमरी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय वृद्धांना प्रथमोपचार देण्यासाठी सायकल अॅम्ब्युलन्स सेवाही सुरू करण्यात येणार आहे.

- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

राज्यात गेल्या काही वर्षात आरोग्य सेवेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. टेलिमेडीसीनसारख्या सुविधा दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना वरदान ठरणार आहेत. राज्य शासनानं सुरू केलेल्या मोटारबाईक अँम्ब्युलन्स, बोट अँम्ब्युलन्ससारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना जलदगतीनं आरोग्य सुविधा मिळत आहेत. मुंबईत अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचणं कठीण असतं. अशा ठिकाणी या मोटारबाईक अँम्ब्युलन्स सेवा देत आहेत.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा