Advertisement

कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आता नवी 'आशा'


कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आता नवी 'आशा'
SHARES

परळ इथल्या टाटा हाॅस्पीटलजवळून जाताना आजूबाजूच्या रस्त्यावर कित्येक संसार थाटलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे संसार असतात, कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांचे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि त्यामुळेच परळच्या टाटा हाॅस्पीटलला लागून असलेल्या रस्त्यांवरच हे नातेवाईक संसार थाटतात. पण आता या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक नवी आशा निर्माण झाली आहे.



टाटा-इन्फोसिस धर्मशाळा उभारणार

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची-खाण्यापिण्याची सोय व्हावी, यासाठी इन्फोसिस कंपनी पुढे सरसावली आहे. टाटा मेमोरियल हाॅस्पीटल आणि इन्फोसिस एकत्र येऊन नवी मंबई येथील टाटा मेमोरीयल हाॅस्पीटलच्या आवारात भव्य धर्मशाळा उभारण्यात येणार अाहे. आशा निवास असं या धर्मशाळेचं नाव असणार असून माफक दरात रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय इथं होणार आहे. शुक्रवारी या प्रकल्पाचं भूमिपुजन इन्फोसिसच्या अध्यक्ष सुधा मूर्ति यांच्या हस्ते करण्यात आलं.


या असतील सुविधा

जवळपास दोन लाख चौरस फूट जागेवर धर्मशाळेची भव्यदिव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत २६० खोल्या, लायब्ररी, किचन, मेडिकल रूम आणि कार पार्किंगची सोय असेल. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात मुंबई-नवी मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची, त्यातही गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी परवड होते. ही परवड दूर करण्यासाठी इन्फोसिस अाणि टाटा मेमोरियल मदतीसाठी पुढे सरसावलं आहे, असं म्हणत सुधा मुर्ती यांनी या धर्मशाळेचा भविष्यात नातेवाईकांना चांगलाच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


७० कोटींचा खर्च इन्फोसिस करणार

भुमिपुजन झाल्यानं आता लवकरच या धर्मशाळेच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. २४ महिन्यांत काम पूर्ण करत धर्मशाळा नातेवाईकांसाठी खुली करण्यात येणार आहे. दरम्यान, या धर्मशाळेसाठी ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च इन्फोसिस करणार आहे.


हेही वाचा -

लॅपटॉप तोंडावर फुटला; २५ शस्त्रक्रियेनंतर वाचला जीव

झोपेतून उठवलं म्हणून डॉक्टरने रुग्णाचं डोकं फोडलं!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा