मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी प्रशासनाला लाॅकडाऊनच्या दृष्टीने तयारीत राहण्याचे निर्देश दिल्यापासून सर्वत्र गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा करत महाराष्ट्रातील परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीला राजेश टोपे देखील उपस्थित होते. एका वृत्तवाहिनीशी या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, लाॅकडाऊन ही कुणालाच न आवडणारी गोष्ट आहे. परंतु लाॅकडाऊन काही एकाएकी लावला जात नाही. त्यासाठी सर्व परिस्थितीचा सांगोपांग विचार केला जातो. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला जातो. त्या दृष्टीनेच मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकांच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
रुग्ण वाढत असताना, त्यांचं प्रमाण काय, आपल्याकडे पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत काय? पुढच्या काही दिवसांत रुग्णवाढ किती होईल, त्यांना आरोग्य सुविधा, अगदी औषधांपासून ते बेडपर्यंत उपलब्धता आहे की नाही, याचा प्रत्येक टप्प्यावर अभ्यास करावा लागतो.
हेही वाचा- लाॅकडाऊन लावल्यास सरकार पॅकेज देणार काय?- चंद्रकांत पाटील
लॉकडाऊन हा अत्यंत विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. एवढंच नाही, तर साधे निर्बंध जरी कडक करायचे असतील, तरी ते कसे करायचे, उद्योगांना हात लावायचा की नाही, हातावर पोट असणाऱ्यांचे प्रश्न, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा, वाहतूक व्यवस्था, निर्बंधांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी आवश्यक मनुष्यबळ, सगळ्यांचा परिणाम नेमका काय होईल, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, असं राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले.
महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाबाधितांची संख्या वाढणं हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने निर्बंध लागू केले, तरी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. हे नियम कोणत्याही परिस्थितीत पाळले जावेत, अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा असते. पण सध्या बाजारपेठांमध्ये गर्दी दिसते, लग्न समारंभ, कार्यक्रमांमध्ये गर्दी दिसते. लोकांच्या तोंडावर मास्क नसतं, सुरक्षित अंतराचे नियम पाळते जात नाहीत. नियम असूनही संसर्ग पसरत असेल, तर त्याला लोकांचा निर्धास्तपणा कारणीभूत आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
(health minister rajesh tope clarifies on lockdown in maharashtra)
हेही वाचा- मास्क न घातल्यास आता ५०० रुपये दंड