Advertisement

कोरोनामुळे ६४ डॉक्टर्स, १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण IMAची आकडेवारी वेगळी

केंद्र सरकारनं दिलेली आकडेवारी आणि IMA दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे IMA नं सरकारला पत्र लिहलं आहे.

कोरोनामुळे ६४ डॉक्टर्स, १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण IMAची आकडेवारी वेगळी
SHARES

सरकारनं म्हटलं आहे की, ११ सप्टेंबरपर्यंत देशभरातील १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. यामध्ये ६४ डॉक्टरांचा देखील समावेश आहे. पण Indian Medical Association (IMA)नं एकूण ३८२ आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स कोरोनाचे बळी पडल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं दिलेली आकडेवारी आणि IMA दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे IMA नं सरकारला पत्र लिहलं आहे. त्यात म्हटलं आहे की, मंत्रालय खात्याकडे कोरोनाविरुद्ध फ्रंट लाईनवर लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांची योग्य आकडेवारी नाही.  

कोरोनाविरूद्ध फ्रंटवर लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ५० लाख रुपयांच्या विमा योजनेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे सरकारनं ही माहिती संसदेला दिली आहे.

कोरोनामुळे संक्रमित झालेले डॉक्टर, परिचारिका, सहाय्यक कर्मचारी आणि आशा कर्मचार्‍यांशी संबंधित प्रश्नाला आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी संसदेत उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, आरोग्याचा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतो आणि केंद्रीय पातळीवर अशा प्रकारचा डेटा गोळा केला जात नाही.

तथापि, पंतप्रधान गरीब कल्याण विमा पॅकेजच्या लाभार्थ्यांचा डेटा राष्ट्रीय स्तरावर गोळा केला असल्याचं त्या म्हणाल्या. यासंदर्भातील आकडेवारी राज्यसभेत सादर केली गेली.

आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आरोग्य कर्मचार्‍यांपैकी २१ जण महाराष्ट्रातील, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील १४-१४, अरुणाचल प्रदेशातील १२ आणि तामिळनाडूमधील १० जण होते.

चौबे म्हणाल्या की, आरोग्य मंत्रालयानं संसर्ग रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. मार्च महिन्यात सर्व राज्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केलं होतं. हे प्रशिक्षण सर्व प्रकारच्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी केलं गेलं होतं. तसंच केंद्रानं राज्यांना संसर्ग निवारण आणि नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यास सांगितलं होतं.

त्याच वेळी रुग्णालयांना नोडल अधिकारी तैनात करण्यास सांगितलं गेलं होतं. जे आरोग्य कर्मचार्‍यांच्या संसर्गाची आणि स्थितीवर लक्ष ठेवू शकतात. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती होती त्यांना सात दिवस वेगळे ठेवण्यात आलं. त्याशिवाय रुग्णालयांमधील कर्तव्याबाबत जूनमध्ये मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या.

विमा योजनेतून दिलासा मिळण्यासाठी मिळालेल्या अर्जांच्या आधारे केंद्र सरकारनं हा डेटा जाहीर केला आहे. वास्तविक संख्या यापेक्षा खूपच जास्त आहे.

गेल्या महिन्यात एका अहवालात असं नमूद करण्यात आलं होतं की, देशातील ८७ हजार हून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. त्यापैकी ५७३ जणांनी आपला जीव गमावला आहे. राज्यांत संक्रमित आरोग्य कर्मचार्‍यांपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोक महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरात या सहा ठिकाणी तैनात आहेत.

अहवालानुसार, कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांच्या विमा योजनेचा दावा करण्यासाठी सरकारला केवळ १४३ अर्ज ऑगस्टपर्यंत मिळाले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यामागील एक कारण म्हणजे बहुतेक मृत्यू हे योजनेच्या कक्षेत येत नाहीत. काही प्रकरणांमध्ये, मृत आरोग्य कर्मचार्‍यांचे नातेवाईक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेमुळे उशीरा अर्ज करतात.हेही वाचा

२७ छोट्या रुग्णालयांमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

महाराष्ट्र : रुग्णालयात येणाऱ्या सर्व मृतदेहांची अँटिजन चाचणी होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा