SHARE

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला वैद्यकीय उपचार न देता त्याला निदान चाचण्या करण्यासाठी तीन तासांपर्यंत रांगेत ताटकळत ठेवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार केईएम रुग्णालयात समोर आला आहे. राम चांदणे (५२) असं या रुग्णाचं नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर विविध चाचण्यांसाठी रांगेमध्ये उभं रहावं लागल्याने चांदेणे यांचा जीव गला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.


तरीही ताटकळत ठेवलं

राम चांदणे हे नायगाव येथे राहणारे आहेत. मंगळवारी राम यांना चालताना दम लागला. शिवाय त्यांना छातीत दुखत असल्याचं जाणवलं. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने त्यांना रात्री साडेअकरा वाजता केईएममध्ये तपासणीसाठी आणलं. त्यावेळी सुरुवातीला त्यांचे दोन ईसीजी काढण्यात आले. त्यावेळी ईसीजीचे निदान नीट असून त्यांना इतर चाचण्या करून घेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला.

प्रकृती अस्वस्थ वाटत असतानाही राम तब्बल तीन तास रांगेमध्ये उभे होते. मात्र त्या चाचण्या होईपर्यंत रात्रीचे अडीच वाजले आणि चांदणे यांची प्रकृती अधिक खालावली. त्यावेळी उपचार देण्याऐवजी डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी रांगेतच उभं ठेवलं. दरम्यान रांगेत उभे असताना राम खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

हृदयविकाराच्या रुग्णाला प्रथमोपचार दिल्यानंतर इतर चाचण्या करण्यासाठी पाठवल्यानंतर रांगेत उभं असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
- अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम

संबंधित विषय
ताज्या बातम्या