Advertisement

संप मागे घेण्याचे हायकोर्टाचे डॉक्टर्सना आदेश


संप मागे घेण्याचे हायकोर्टाचे डॉक्टर्सना आदेश
SHARES

मुंबई - निवासी डॉक्टर्सच्या संपाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व डॉक्टर्सना तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, भविष्यात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रूग्णालयात रूग्णांबरोबर केवळ दोनच नातेवाईकांना थांबता येईल, असा नियम तयार करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याशिवाय, न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रूग्णालयांमध्ये 1100 सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्याचेही आदेश दिले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 5 एप्रिलपर्यंत 500 तर 13 एप्रिलपर्यंत उर्वरित 600 सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत निवासी डॉक्टर्सच्या संपाबाबत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार ठामपणे डॉक्टर्सच्या मागे उभे असल्याचे सांगितले. तसेच डॉक्टर्सवर हल्ले होऊ नयेत याची सरकार काळजी घेईल असंही त्यांनी आश्वासन दिले. रुग्णांना सेवा न देणं आणि संपावर जाणं हे योग्य नसल्याचं सांगत लवकरच सरकार ठोस निर्णय घेईल अशी माहितीही त्यांनी आपल्या निवेदनात दिली.

निवासी डॉक्टर्सच्या संपाचे पडसाद पालिकेतही उमेटले. संपावरून स्थायी समिती तहकूब करण्यात आली होती. प्रशासनाकडून गंभीर दखल न घेतल्याने भाजपासह विरोधकांनी सभात्याग केला.

निवासी डॉक्टर्सच्या संपाचा आज चौथा दिवस होता. सरकारने तंबी देऊनही डॉक्टर्स कामावर रुजू न झाल्याने वातावरण चांगलंच चिघळले होते. त्यातच बुधवारी रात्री सायन रुग्णालयाच्या डॉक्टर मानसी पाटील यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. निमोनीयानं बाधित 3 महिन्यांच्या मुलीवर उपचार करण्याच्या वादावरून रुग्णाची आई आणि आजीमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या डॉक्टर्स मानसी पाटील यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या गंभीर घटनेनंतर तब्बल 15 मिनिटानंतर सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचले. यामुळे संतापलेल्या डॉक्टर्सनी सायन रुग्णालयाच्या आवारातच जमिनीवर बसून निदर्शनं केली. परिसरातल्या इतर रुग्णालयांतल्या डॉक्टरांनी निदर्शनात सहभागी होऊन त्यांना साथ दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा