Advertisement

गुडघ्याच्या पुनर्शस्त्रक्रियेतही रूग्णांची लूट, 277 टक्क्यांपर्यंत नफेखोरी


गुडघ्याच्या पुनर्शस्त्रक्रियेतही रूग्णांची लूट, 277 टक्क्यांपर्यंत नफेखोरी
SHARES

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या कृत्रिम यंत्रसामग्रीत कंपन्या, वितरक आणि रुग्णालय 313 टक्क्यापर्यंत नफेखोरी करत असल्याची धक्कादायक माहिती गेल्या आठवड्यात राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणा (एनपीपीए-नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग अॅथाॅरिटी) ने एका आकडेवारीसहित जाहीर केली होती.

त्या पुढे जात बुधवारी 'एनपीपीए'ने आणखी एक पत्रक जारी करत गुडघ्याच्या पुनर्शस्त्रक्रियेसाठीच्या यंत्रसामग्रीतही कंपन्या, वितरक आणि रूग्णालय 277 टक्क्यांपर्यंत नफेखोरी करूत रूग्णांची लूट करत असल्याची माहिती उघड केली आहे. त्यामुळे आता 'एनपीपीए' पुनर्शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या किमती नियंत्रित करण्याची शक्यता आहे. या अगोदर 'एनपीपीए'ने औषधांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत.

स्टेण्ट आणि कॅथेटरच्या किमती निश्चित केल्यानंतर 'एनपीपीए'ने 'गुडघ्याची वाटी' बदलण्यासाठीच्या रोपण शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीकडे मोर्चा वळवला आहे. संपूर्ण गुडघारोपणासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची मूळ किंमत ६५, ७८२ रुपये असताना रूग्णाकडून चक्क ४,१३,०५९ रुपये उकळले जात असल्याचे 'एनपीपीए'ने पत्रकातून स्पष्ट केले आहे.

यावरून कंपन्या, वितरक आणि रूग्णालये मिळून ३१३ टक्क्यांचा नफा कमवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून 'एनपीपीए'ने या नफेखोरीबाबत आठवड्याभरात सूचना-हरकती मागवण्यास सुरूवात केली आहे.



असा आहे मूळ खर्च 

पहिली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यानंतर करण्यात येणाऱ्या दुसऱ्या, पुनर्शस्त्रक्रियेतही रूग्णांची मोठी लूट होत असल्याचे 'एनपीपीए'ने आकडीवारीनुसार जाहीर केले आहे. टिबियल प्लेटसाठी २७७ टक्के, पटेला (पाठीचा कणा)साठी २१९ टक्के, तर फेमोरेल (मासांसंबंधीच्या शस्त्रक्रिये) साठी १९६ टक्के आणि इन्सर्टसाठी १८२ टक्के इतकी नफेखोरी केली जात असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

टिबियल प्लेटची मूळ किंमत ५१,००० रुपये असताना रुग्णांकडून १ लाख ६५ हजार रुपये आकारले जातात. फेमोरेलची (मासासंबंधीच्या शस्त्रक्रियेसाठीची यंत्रसामग्री) मूळ किंमत २७, ८७७ पासून ७९, ४३३ रुपये अशी असताना रूग्णांकडून ७४, ८७५ ते २,६७,५०० रुपयांपर्यंत रक्कम आकारली जाते.


नफेखोरीला आळा बसणार

'एनपीपीए'ने ही आकडेवारी जाहीर करत गुडघा रोपणासाठीच्या शस्त्रक्रियेसाठीची यंत्रसमाग्री अर्थात वैदयकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांकडून सूचना-हरकती मागवल्या आहेत. अर्थात ही आकडेवारी खरी-खोटी आहे वा यावर त्यांचे म्हणणे काय आहे? हे मांडण्याची संधी कंपन्यांना देण्यात आली आहे.

या सूचना-हरकतींचा अभ्यास करत 'एनपीपीए'कडून यासंबंधीचा अतिम निर्णय अर्थात या वैदयकीय उपकरणांच्या किमती नियंत्रित करायच्या की नाही यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे.


आकडेवारी चुकीची - कंपन्यांचा दावा

'एनपीपीए'ने जाहीर केलेल्या आकडेवारीने वैदयकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या कंपन्यांच्या एका संघटनेने ही आकडेवारी साफ चुकीची असल्याचा दावा करत यासंबंधीचे स्पष्टीकरण देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता या दाव्यासंबंधी 'एनपीपीए' काय निर्णय घेते हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसोबत सर्वच वैदयकीय उपकरणांच्या किमतीत नफेखोरी होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच सरसकट सर्वच वैद्यकीय उपकरणांचा समावेश औषधांमध्ये करत त्यांच्या किमती नियंत्रित करण्याचा निर्णय 'एनपीपीए'ने एकाच वेळी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे एक-एक निर्णय घेण्यात वेळ वाया जात असून त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यामुळे सरसकट सर्वच वैद्यकीय उपकरणांसंबंधीचा निर्णय 'एनपीपीए'ने एकाचवेळी घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
- उमेश खके, कार्यकर्ते, जनआरोग्य चळवळ



हे देखील वाचा - 

महाग स्टेण्टप्रकरणी एनपीपीएकडे रूग्णालयांबद्दल तक्रारी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा