Advertisement

शिक्षण एमबीबीएस.... पण पगार सहा हजार रुपये; डॉक्टर्स डे स्पेशल


शिक्षण एमबीबीएस.... पण पगार सहा हजार रुपये;  डॉक्टर्स डे स्पेशल
SHARES

पदव्युत्तर शिक्षणानंतर शाळेतले मित्र कधीतरी भेटले तर त्यात सर्वात पहिला विषय निघतो तो पगाराचा ! प्रत्येक जण नोकरी आणि पगार अगदी ताठ मानेने सांगतो. पण त्या ग्रुपमधल्या एका डॉक्टरचा आवाज मात्र तेव्हा नरमलेला असतो.  कारण त्याचं शिक्षण असतं एम. बी. बी. एस.  पण त्याचा पगार असतो केवळ ६ हजार रुपये.....!
 
ही व्यथा आहे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची. वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना किमान एक सेमिस्टर इंटर्नशीप करणं गरजेचं असतं.  यालाच वैद्यकीय भाषेत मेडिकल इंटर्नशीप असं म्हणतात शिकाऊ डॉक्टर म्हणजे इंटर्न डॉक्टर हे मेडिकल इंटर्नशीपमध्ये शिक्षणासोबतच रुग्णसेवा करत असतात. या इंटर्नशीपमध्ये विद्यार्थीरुपी डॉक्टरांना किती समस्यांना सामोरं जावं लागतं याचा आढावा घेतलाय मुंबई लाईव्हने अाजच्या डॉक्टर्स डे निमित्त.


कामाच्या अनियमित वेळा

मेडिकल इंटर्नशीपमध्ये सर्वसामान्य कामासारखी वेळ ठरवलेली नसते.  कामाच्या वेळा अनियमित असतात.  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आठवड्यातून एकदा २४ तासाची इमर्जन्सी ड्युटी ही करावीच लागते. कधी कधी ही ड्युटी ३० तासांची होते. पण त्यानंतर त्यांना सुट्टी मिळत नाही. किंवा उशिरा कामावर येण्याची सूट मिळत नाही.


अवघे ६ हजार विद्यावेतन

महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं विद्यावेतन ६ ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बिहारमध्ये १६ हजार, कोलकातामध्ये २१ हजार, केरळमध्ये १६ हजार तर छत्तीसगडसारख्या राज्यात १८ हजार रुपये वेतन दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी वेतन दिलं जात असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व इंटर्न डॉक्टरांनी नुकताच संप पुकारला होता. 

७ दिवसाच्या कामबंद आंदोनलानंतर शासनाने हे विद्यावेतन पुढील दोन महिन्यात वाढवून देऊ असं आश्वासन दिलं आहे. आश्वासनापेक्षा लिखित स्वरूपात आम्हाला याची ग्वाही मिळावी, असं इंटर्न डॉक्टर संघटनेचे सेक्रेटरी डॉ. गोकुळ राख यांनी सांगितलं. 


डॉक्टर-रुग्णांमधील दुवा 

रुग्णालयात कोणत्याही रुग्णाला सर्वप्रथम प्रशिक्षणार्थी  डॉक्टर हाताळतात. त्यांचे केसपेपर बनवणे, त्यांच्या प्राथमिक चाचण्या करून घेणे आणि त्याचा अहवाल मुख्य डॉक्टरांना देणं हे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं काम आहे. म्हणूनत त्यांना मुख्य डॉक्टर आणि रुग्णांमधील दुवा म्हटलं जातं.

पालक उचललात इतर खर्च

इंटर्नशिपमध्ये दरमहा ६ ते ११  हजार मिळणारं वेतन पुरेसं नाही. कधी कधी त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागत. त्याचा खर्च रुग्णालय करत नाही. तो खर्च देखील डॉक्टर स्वतःच्या खिशातून करतात. घरापासून लांब राहून एवढ्या तुटपुंज्या पगारात परवडत नसल्याने परत कुटुंबाकडे बाकी खर्चासाठी पैसे मागण्याची वेळ येते. हे खूप लज्जास्पद आहे.  मात्र, गरीब आई - वडील आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याचा विचार करत तोही खर्च उचलायला तयार होतात, असं प्रशिक्षणार्थी डॉ. अनिकेत माने यांनी सांगितलं.


उपकरणेदेखील स्वखर्चाने

इंटर्नशीपमध्ये लागणारी वैद्यकीय उपकरणे जसे की स्टेट्सकोप, प्रायमरी बीपी मशीन, प्रायमरी शुगर मशीन ही स्वतः प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आणावी लागते. याचा खर्च रुग्णालय करत नाही. शिक्षणाच्या पहिल्याच वर्षी 'अॅनोटॉमी' या विषयामध्ये मानवी सांगाड्याबद्दल शिकवलं जातं. त्यावेळी स्वतंत्रपणे नीट शिकता यावं यासाठी तो सांगाडा प्रत्येकाला स्वखर्चाने आणायला सांगितला जातो. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्यांची अक्षरशः पिळवणूक होते.

विद्यावेतन हे प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांच्या अडचणींचे मूळ अाहे.  जर महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांप्रमाणे या डाॅक्टरांना विद्यावेतन मिळालं तर त्यांचे बहुतांशी प्रश्न सुटण्यास मदत होईल.



हेही वाचा -

रुग्णांनो, टेन्शन नाॅट, शस्त्रक्रियेचा खर्च 'असा' येणार नियंत्रणात!


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा