Advertisement

सायन रूग्णालयातील शवविच्छेदन विभाग २४ तास सुरू

आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास शवविच्छेदन विभाग सुरू ठेवणारं सायनचं टिळक रुग्णालय हे मुंबईतील पहिलं महापालिका रुग्ण्यालय ठरलं आहे.

सायन रूग्णालयातील शवविच्छेदन विभाग २४ तास सुरू
SHARES

सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात आता २४ तास शवविच्छेदन (पोस्टमार्टम) विभाग सुरू राहणार अाहे. आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास शवविच्छेदन विभाग सुरू ठेवणारं सायनचं टिळक रुग्णालय हे मुंबईतील पहिलं महापालिका रुग्ण्यालय ठरलं आहे.


मृताच्या नातेवाईकांना मनस्ताप 

रात्री ८ वाजता अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला आणि शवविच्छेदनाची गरज असेल तर मृताच्या नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी १२ ते १५ तास ताठकळत बसावं लागतं. यामुळं मृताच्या नातेवाईकांना फार मनस्ताप सहन करावा लागत होता. यावर अनेकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं हा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात दिवसभर शवविच्छेदन विभाग सुरू असतो. तेथे संध्याकाळी सहानंतर फक्त महत्त्वाच्या प्रकरणातील मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येतं.


वर्षाला ४२०० शवविच्छेदन

सायन रुग्णालयात दरवर्षी ४२०० मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येतं. दिवसाला सरासरी सात शवविच्छेदन करण्यात येत असून जवळपास १६ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणं सायन रुग्णालयात दाखल होतात. सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर शवविच्छेदनासाठी दाखल झालेले मृतदेह सुमारे १२ ते १४ तासानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिली जातात. मात्र. तेवढा वेळ त्या मृताच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो.


आम्ही २४ तास शवविच्छेदनाची सुविधा सुरू करणार अाहोत. मात्र, खून, हुंडाबळी, बुडून मृत्यू, डॉक्टरांच्या निष्काळजीपणानं झालेल्या मृतांचं शवविच्छेदन करण्यात येणार नाही. पण रस्ते अपघात, रुग्णालयात निधन झालेले किंवा आगीत जळालेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन लगेचच करण्यात येणार आहे. सोमवारी १३ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात अाली अाहे.  २४ तास शवविच्छेदन विभाग सुरू ठेवणारं हे पहिलं महापालिका रुग्णालय ठरलं याचा मला अभिमान आहे.
 - डॉ. राजेश देरे, फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख



हेही वाचा-

फार्मसिस्ट नसल्यानेच गोवंडीत औषधबाधा?

आता एफडीएचं लक्ष्य चायनीज गाड्या; पुढच्या आठवड्यापासून विशेष मोहीम




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा