Advertisement

आता एफडीएचं लक्ष्य चायनीज गाड्या; पुढच्या आठवड्यापासून विशेष मोहीम

मुंबईभरातील चायनीज गाड्यांची तपासणी करत अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई) अन्न, एफडीए यांनी दिली आहे. यासाठी एफडीएकडून विशेष मोहिम राबवली जाणार असून या मोहिमेला पुढील आठवड्यात सुरूवात करण्यात येणार आहे.

आता एफडीएचं लक्ष्य चायनीज गाड्या; पुढच्या आठवड्यापासून विशेष मोहीम
SHARES

काही दिवसांपुर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी इथं चायनीज खाल्ल्यानं ३० जणांना विषबाधा झाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील शिवडीतील झोपडपट्टीत रोगट आणि मेलेल्या कोंबड्या विकल्या जात असल्याची अाणि अशा कोंबड्या चायनीज बनवण्यासाठी वापरल्या जात असल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून नुकतीच समोर आली आहे.

हे दोन्ही गंभीर प्रकार लक्षात घेता मुंबईसह राज्यभरातील एफडीए अधिकाऱ्यांना कोंबडी विक्रेत्यांसह चायनीज गाड्यांवर लक्ष केंद्रीत करत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


अधिकारी-कर्मचाऱ्यांचं विशेष पथक

आयुक्तांच्या आदेशानुसार आता एफडीएच्या अन्न (बृहन्मुंबई ) विभागानं कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईभरातील चायनीज गाड्यांची तपासणी करत अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई) अन्न, एफडीए यांनी दिली आहे. यासाठी एफडीएकडून विशेष मोहिम राबवली जाणार असून या मोहिमेला पुढील आठवड्यात सुरूवात करण्यात येणार आहे. तर या मोहिमेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचं एक विशेष पथकही तयार करण्यात येणार असल्याचंही आढाव यांनी सांगितलं आहे.

मेलेल्या कोंबड्या चायनीजमध्ये

मरुन खूप काळ झालेल्या कोंबड्या साफ करून तसंच रोगट कोंबड्या मारून चायनीज गाड्या चालवणाऱ्यांना ३० रूपये किलोने विकल्या जात आहेत. तर मेलेल्या, रोगट कोंबड्या कचऱ्यात फेकल्यानंतर त्या उचलून आणून साफ करून ग्राहकांना तसेच चायनीज गाड्यीवाल्यांना विकल्या जात अाहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक असून अशा कोंबड्यांपासून बनवलेलं चायनीज तसंच पदार्थ खाणं आरोग्यास घातक ठरू शकतं. पोटाच्या विकारासह अन्नबाधा, विषबाधा होऊ शकते. त्यामुळं या प्रकारची दखल घेत आता एफडीएनं मुंबईतील सर्व चायनीज गाड्यांना लक्ष्य केलं आहे.

...तर परवाना रद्द 

मुंबईतील सर्व चायनीज गाड्यांची तपासणी करत तिथं मांस कोणत्या प्रकारचं वापरलं जात आहे, चायनीज साॅस कोणते वापरतात, कच्चा माल काय वापरतात, स्वच्छतेचे नियम पाळतात का यासह एफडीएची नोंदणी-परवाना आहे का या सर्व बाबी तपासल्या जाणार असल्याचं आढाव यांनी स्पष्ट केलं आहे. अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दोषी आढळल्यास चायनीज विक्रेत्यांविरोधात कारवाई करत त्यांना नोटीसा बजावण्यात येतील. नोटिशीनंतरही सुधारणा न झाल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असंही आढाव यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

संपामुळं सरकारी रूग्णालयात रुग्णांचे हाल, शस्त्रक्रियाही रद्द

एेतिहासिक! डाॅक्टर म्हणताहेेत, नो टेलिफोनिक कन्स्लटेशन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा