Advertisement

ओमायक्रॉनला आळा घालण्यासाठी पालिकेची जंबो केंद्रे पुन्हा सुसज्ज

नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं आरोग्ययंत्रणा पुन्हा एकदा सुसज्ज करण्यास सुरुवात केली आहे.

ओमायक्रॉनला आळा घालण्यासाठी पालिकेची जंबो केंद्रे पुन्हा सुसज्ज
SHARES

मुंबईला ओमायक्रॉनच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयारीला सुरूवात केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं आरोग्ययंत्रणा पुन्हा एकदा सुसज्ज करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं जंबो कोरोना उपचार केंद्रे टप्प्याटप्यानं बंद करण्याचा व गरज पडल्यास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार ही जंबो केंद्रे सुसज्ज ठेवण्याचे व रुग्णसंख्येमध्ये किंचितही वाढ दिसली तरी ही आरोग्यव्यवस्था तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळं कोरोना रुग्णालयांचं रुपांतरही नॉन कोविड रुग्णालयांमध्ये करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्यानं सुरू झाली होती. कोरोना रुग्णसंख्या वाढली तर यासंदर्भातही पुन्हा फेरविचार करण्यात येणार आहे. 

सध्या परावर्तित स्वरूपाच्या विषाणूमुळं चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका रुग्णालयांनी पुन्हा जोमानं तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. औषधांची उपलब्धता तपासली जात आहे. कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची पुरेशी उपलब्धता प्रत्येक रुग्णालयामध्ये तसेच जंबो रुग्णालयामध्ये ठेवण्यात येणार आहे.

दुसऱ्या लाटेनंतर आतापर्यंत महापालिकेनं उपनगरी रुग्णालयं, जंबो केंद्रे, प्रमुख रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता तसंच नवीन प्रकल्पांची उभारणी केली आहे. त्यामुळं रुग्णसंख्या वाढून त्यांना ऑक्सिजनची अधिक गरज लागली तर ती पूर्ण होऊ शकेल. कस्तुरबाच्या अद्ययावत प्रयोगशाळेमध्ये ३९० नमुन्यांची चाचणी केली जात आहे. 

जितक्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग शक्य आहे ते केले जात आहे. त्यामधून नव्या स्वरूपाच्या परावर्तित विषाणूचे निदान करणे शक्य होणार आहे. लोकांनी निर्धास्तपणे फिरू नये. करोना संसर्गाला अटकाव करणाऱ्या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करायलाच हवे. यापूर्वी २ लाटांमधील रुग्णसंख्या व मृत्युसंख्या लक्षात घेता हलगर्जीपणा करू नये.

चाचण्यांचा वेग पुन्हा एकदा वाढवण्यात येणार आहे. आरोग्ययंत्रणेला तपासणी, निदान, पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या निदानासाठी आरटीपीसीआर चाचणीची मदत घेण्यात येणार आहे. ज्यांचे लसीकरण झालेलं नाही तसंच ज्यांनी अद्याप दुसरी मात्रा घेतलेली नाही अशा व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावं यादृष्टीनं समुपदेशन, आवाहन करण्यात यावं, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

खासगी डॉक्टरांना करोना रुग्णांची संख्या तसेच विषाणूच्या परावर्तित स्वरूपाची लक्षणे असलेला संशयास्पद रुग्ण आढळून आल्यास त्याची त्वरित नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा