Advertisement

मुख्याध्यापिकेनं माझी विचारपूस तरी करायची होती, विजया चौगुलेने व्यक्त केली खंत

रुग्णालयात दाखल झाल्यापासून विजयाची आप्तेष्ट, समाजसेवक, राजकारण्यांपासून शिक्षणमंत्री विनोद तावडे अशा सर्वांनी भेट घेतली. पण, ज्या मुख्याध्यापिकेमुळे आपल्यावर ही परिस्थिती ओढवली त्यांनी माझी साधी विचारपूसही केली नाही, याचं फार दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया विजया चौगुलेने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मुख्याध्यापिकेनं माझी विचारपूस तरी करायची होती, विजया चौगुलेने व्यक्त केली खंत
SHARES

तब्बल ३०० उठाबशा काढून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करणारी कोल्हापूरच्या शाळेतील विद्यार्थीनी विजया चौगुले सध्या परळच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून विजयाची आप्तेष्ट, समाजसेवक, राजकारण्यांपासून शिक्षणमंत्री विनोद तावडे अशा सर्वांनी भेट घेतली. पण, ज्या मुख्याध्यापिकेमुळे आपल्यावर ही परिस्थिती ओढवली त्यांनी माझी साधी विचारपूसही केली नाही, याचं फार दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया विजयाने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मुख्याध्यापिकेने विजयाला केलेल्या शिक्षेवरुन राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. एवढं सर्व होऊनही शाळेत शिकणारी विद्यार्थी म्हणून मुख्याध्यापिकेने माझी तब्येत कशी आहे? याची साधी विचारपूस केली नाही. यावरुन जगात माणुसकी कुठेतरी हरवत चालल्याचा प्रत्यय येत असल्याचं मतही तिने व्यक्त केलं.



बुधवारी डिस्चार्जची शक्यता

विजयाची प्रकृती आता स्थिर असून तिला बुधवारपर्यंत डिस्चार्ज मिळेल, अशी शक्यता केईएममधील डॉक्टरांनी व्यक्त केली. तसंच केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी देखील विजयाला येत्या २ दिवसांत डिस्चार्ज दिला जाईल, असं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं होतं. त्यानुसार, डिस्चार्ज मिळाल्यानंतर विजया परत आपल्या मूळगावी म्हणजेच कोल्हापूरला परतणार आहे.


काय आहे प्रकरण?

कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूकमधील भावेश्वरी संदेश शाळेत आठवीत शिकणाऱ्या विजया चौगुलेला मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी ५०० उठाबशा काढायची शिक्षा दिली. ३०० उठाबशा काढल्यानंतर विजयाची प्रकृती बिघडली. शिक्षेचा तिच्या शरिरावर आणि मनावर परिणाम झाला. तिचे पाय थरथर कापायला लागले म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिला कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण, तिथं तिच्या प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्या तिला केईएममध्ये दाखल करण्यात आलं. केईएममध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या काही तासांतच विजयाची प्रकृती सुधारली. आणि आता विजया ठणठणीत बरी होऊन घरी जायला तयार आहे.


मला सगळे येऊन भेटून गेले. माझी विचारपूस केली पण, माझ्या शाळेने किंवा माझ्या मुख्याध्यापिकेने माझी अजिबात विचारपूस केली नाही. मुख्याध्यापिका कोल्हापुरातील रुग्णालयाबाहेर आल्या होत्या. पण, मला बघितलंही नाही. विचारलंही नाही. त्या आल्या आणि तशाच लगेच निघून गेल्या. याचं मला फार वाईट वाटतंय.

- विजया चौगुले, विद्यार्थिनी


विजयाच्या तब्येतीविषयी तिच्या वडिलांशी चर्चा केली असता, विजया आता हळूहळू ठिक होत असल्याचं त्यांनी सांगितलं.



विजया आता हळूहळू बरी होत आहे. तिला अजून थोडा त्रास आहे. तिच्या सर्व शारीरिक चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार डॉक्टर लवकरच तिला डिस्चार्ज देतील. आता तिच्या पायाचं थरथरणंही कमी झालं आहे. तिचा मानसिक तणाव देखील कमी झाला आहे. त्यामुळे आम्ही केईएमच्या डॉक्टरांचे खूप आभार मानतो.

- निवृत्ती चौगुले, विजयाचे वडील


विजयावर केईएम रुग्णालयाच्या मेंदूविकार विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. संगीता रावत यांनी उपचार केले आहेत. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, येत्या दोन दिवसांत तिला डिस्चार्ज देऊन ती घरी सोडण्यात येऊ शकतं, असं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.



हेही वाचा-

३०० उठाबशा काढलेल्या विद्यार्थिनीवर केईएममध्ये उपचार?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा