Advertisement

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणार

नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड या रक्तपेढ्यांना आकारण्यात येईल.

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणार
SHARES

राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड या रक्तपेढ्यांना आकारण्यात येईल. सोबतच जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णांना परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. 

राज्यामध्ये काही रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे प्राप्त होत आहेत. यामध्ये थॅलेसिमिया रुग्णांना रक्त न देणं, त्यांचेकडून प्रक्रिया शुल्क घेणं, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दाखवणं, तसंच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी विहित रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणं अशा आशयाच्या तक्रारी/निवेदने प्राप्त होत आहेत.

त्याअनुषंगाने राज्यात अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय/राज्य संक्रमण परिषद/शासन यांचेकडून रक्त व प्लाझ्मा तसंच प्रक्रियेसाठी विहित केलेल्या दरापेक्षा अवाजवी रक्कम आकारणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद/राज्य रक्त संक्रमण परिषद/शासन यांनी विहित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा प्रक्रिया शुल्क आकारल्यास जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड केला जाईल. यापैकी जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येणार असून उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

हेही वाचा- भारतात जानेवारीपर्यंत मिळू शकते व्हॅक्सीनला आपत्कालीन मंजुरी

थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेले ओळखपत्र असतानादेखील अशा रुग्णांना प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या तीनपट दंड केला जाईल. यापैकी प्रक्रिया शुल्क संबंधित रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

सूचना फलकावर/संकेतस्थळावर पुरविलेल्या माहितीप्रमाणे रक्त उपलब्ध असताना देखील थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांना कोणतेही सबळ कारण नसताना रक्त वितरण करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक १ हजार रुपये दंड आकारला जाईल. प्रक्रिया शुल्क रुग्णास परत करण्यात येईल.

ई रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठा व अनुषंगिक माहिती न भरल्यास प्रतिदिन १ हजार रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तपेढीकडून जी माहिती भरणे अनिवार्य आहे, अशी माहिती न भरल्यास अथवा भरलेली माहिती अद्ययावत नसल्यास त्यासाठी विहित कालावधी संपल्यानंतरच्या कालावधीसाठी ५०० रुपये प्रतिदिन दंड आकारला जाणार आहे.

दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधित रक्तपेढीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची एक संधी देण्यात येईल. रक्तपेढीकडून वारंवार मार्गदर्शक तत्वे/ सूचनांचं उल्लंघन केलं गेल्यास, अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येईल व अशा रक्तपेढ्यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल.

(maharashtra government will take a strict action against faulty blood bank)

Read this story in English
संबंधित विषय