Advertisement

राज्यातील जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती


राज्यातील जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती
SHARES

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता येत्या काही दिवसात अनेक ठिकाणी निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात दरदिवशी कोरोनाचा स्फोट होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याची परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

राज्यात रविवारी दिवसभरात तब्बल १६ हजार ६२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २३ लाख १४ हजार ४१३ इतकी झाली आहे. सध्या महाराष्ट्रात १ लाख २६ हजार २३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर काल दिवसभरात तब्बल ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तब्बल ५२ हजार ८६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा २.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात ८ हजार ८६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत २१ लाख ३४ हजार ७२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२.२ टक्के इतकं आहे. राज्यात सध्या ५ लाख ८३ हजार ७१३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ५ हजार ४९३ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत १७ कोटी ५१ लाख १६ हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी २३ लाख १४ हजार ४१३ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबई शहरातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल १९६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १२५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या १३९४० सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण ११५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत सध्या सार्वजनिक वाहतूक सुरु झाली आहे. त्यातच अनलॉकमुळे सर्व काही सुरळीत पूर्वीप्रमाणे सुरु आहे. पण याकाळात अनेक जण मास्क सॅनिटायझरचा वापर करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे मुंबईत निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. पुण्यात दिवसभरात १७४० नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. पुण्यात दिवसभरात १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी २ रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत ४९५२ रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात सध्या ३५५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सध्या ११५९० रुग्ण सक्रीय आहेत.

पुण्यात रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दुप्पट आहे. पुण्यात दिवसभरात उपचारादरम्यान १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील दोन रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पुण्यात ३५५ कोरोनाबाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाख १८ हजार २०२ वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण ४९५२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या २०१६६१ एवढी आहे.

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेयत. हॉटेल आणि मॉल रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.

नागपूर कोरोना रुग्णांची सद्यस्थिती

नागपूर शहर परिसरात काल दिवसभरात ३७७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूर शहरात एकूण २३ हजार ६५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर नागपूर महानगरपालिकेत १९७६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेत १ लाख ४९ हजार ८८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

नागपुरात लॉकडाऊन

कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागपूर शहरात आज १५ मार्चपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला. नागपुरात आज सकाळपासूनच लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

नागपुरात २५०० पोलीस शहरात तैनात करण्यात आले. तसेच दुचाकीवर दोन जण फिरताना फिरल्यास आणि चार चाकी वाहनात दोन पेक्षा जास्त लोक असल्यास वाहन जप्त करण्यात येईल. त्याशिवाय जो कोणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध

कल्याण-डोंबिवली परिसरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार P-1 आणि P-2 यानुसार दुकाने सुरु ठेवण्यात येतील. खाद्यपदार्थ आणि शीतपेयाच्या गाड्या रात्री ७ वाजेपर्यंतच सुरु राहतील. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेनं सुरु राहील.

लग्न आणि हळदी समारंभ सकाळी ७ ते संध्याकाळी ९ या वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसारच करण्यात यावेत. अन्यथा वर-वधू आणि हॉल मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केडीएमसी परिसरातील बार रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील. होम आयसोलेशनमध्ये असणारा रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

मीरा भाईंदरमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मीरा भाईंदर मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन असणार आहे. ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. मीरा भाईंदर क्षेत्रामधील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर हा नियम लागू नसेल.

हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट क्षेत्राबाहर सर्व हॉटल्स, रेस्टॉरंट, बार, हॉल आणि फूड कोर्ट इत्यादी ठिकाण्याच्या सेवा ५० टक्के क्षमतेसह सुर राहतील. तसेच, मॉलसहित सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील

पनवेलमध्ये नाईट कर्फ्यू

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १२ ते २२ मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच २२ मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.

वाशिममध्ये नाईट कर्फ्यू

वाशिम जिल्ह्यात ८ मार्च ते १५ मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यानुसार संध्याकाळी ५ पासून सकाळी ९ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ९ पर्यंत ३८ तासांची संचारबंदी लागू आहे. याच दरम्यान दूध विक्रेते, डेअरी यांना सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर दवाखाने,मेडिकल हे २४ चालू राहणार आहे.

धुळ्यात जनता कर्फ्यू

धुळे जिल्ह्यात चार दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजेपासून ते बुधवारी पहाटे ६ वाजेपर्यंत असा हा जनता कर्फ्यू असेल. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळ्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा