Advertisement

औषधं खरेदी करताय? मग सावधान.. हे नक्की वाचा

मालाडमधील ६७ वर्षीय दिगंबर धुरी यांना व्हिटामिनच्या औषधांच्याएेवजी चक्क कॅन्सरची औषध देण्यात आली. या औषधांचं सेवन करणाऱ्या धुरी यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला नि त्यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये घडलेल्या या प्रकरणाची चौकशी पूर्ण करत एफडीएनं महिन्याभरापूर्वी संबंधित औषध विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार मालाड पश्चिम पोलिसांनी २ दिवसांपूर्वीच या औषध विक्रेत्याला अटक केली.

औषधं खरेदी करताय? मग सावधान.. हे नक्की वाचा
SHARES

अधिकृत, फार्मासिस्ट असलेल्या औषध दुकानांतूनच औषधं घ्या, डाॅक्टरांच्या सल्ल्याने-प्रिस्क्रिप्शननुसारच घ्या, औषध घेतल्यानंतर बिल घ्या, डाॅक्टरांना दाखवल्यानंतरच औषधांचं सेवन करा, अशा एक ना अनेक सूचना रुग्णांना वारंवार दिल्या जातात. पण या सूचनांकडं दुर्लक्ष करत अनेकजण औषधांची खरेदी करतात. मात्र ही औषधखरेदी कशी आणि किती महागात पडू शकते, हे अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)कडे गेल्या वर्षी आलेल्या एका प्रकरणातून समोर आली आहे.


चुकीच्या औषधखरेदीचा फटका

मालाडमधील ६७ वर्षीय दिगंबर धुरी यांना व्हिटामिनच्या औषधांच्याएेवजी चक्क कॅन्सरची औषध देण्यात आली. या औषधांचं सेवन करणाऱ्या धुरी यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला नि त्यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये घडलेल्या या प्रकरणाची चौकशी पूर्ण करत एफडीएनं महिन्याभरापूर्वी संबंधित औषध विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार मालाड पश्चिम पोलिसांनी २ दिवसांपूर्वीच या औषध विक्रेत्याला अटक केली. या औषध विक्रेत्याची लागलीच जामिनावर सुटका झाली असली, तरी यानिमित्तानं औषध खरेदीचा प्रश्न एेरणीवर आला आहे.


कशा घेतल्या चुकीच्या गोळ्या?

धुरी रात्री मित्रांबरोबर हाॅटेलमध्ये जेवून घरी परतत असताना रस्त्यावर पडले. त्यानंतर ते जवळच्या रूग्णालयात गेले. तेथील डाॅक्टरांनी त्यांना जी काही औषधं लिहून दिली ती औषधं त्यांनी मालाड पूर्व येथील दत्तात्रय रोडवरील कल्पेश मेडिकल स्टोअर्समधून घेतली. औषधं घेतल्यानंतर औषध डाॅक्टरांना न दाखवताच धुरी घरी परतले नि डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार औषधांचे डोस घेऊ लागले.


प्रकृती खालावली

या औषधांच्या सेवनानंतर, १५-२० दिवसांनी धुरी यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना त्वरीत हाॅस्पीटलमध्ये दाखल करावं लागलं. धुरी कोणत्याही औषधांना, उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. डाॅक्टरांनी योग्य तपासणी केली असता त्यांनी चुकीची औषध घेतल्यानं त्यांच्या शरिरावर त्याचा घातक परिणाम झाला असून त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाल्याचं समजलं. त्यानंतर डाॅक्टरांनी उपचार सुरू केले, पण धुरी काही यातून वाचू शकले नाही.



व्हिटामिनऐवजी कॅन्सवरील औषध

धुरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी थेट 'एफडीए'कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एफडीएनं केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यात अधोरेखित करणारी बाब म्हणजे डाॅक्टरने प्रिस्क्रिप्शनमध्ये Folimax 10 असं औषध लिहून दिलेलं असताना औषध विक्रेत्याने धुरी यांना Folitrax 10 हे दुसरंच औषध दिलं. डाॅक्टरने धुरी यांना व्हिटामिनचं औषध लिहून दिलं होतं, तर औषध विक्रेत्याने धुरी यांना चक्क कॅन्सरवरील औषध दिलं.


तब्येत खालावून मृत्यू

धुरी यांना दिवसातून २ वेळा व्हिटामिनच्या गोळ्या खाण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. त्यानुसार धुरी यांनी या चुकीच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याचा फटका त्यांना बसला. ज्या चुकीच्या गोळ्या धुरी यांनी घेतल्या त्या गोळ्या कॅन्सरच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच घ्यायच्या असतात. पण धुरी यांनी ५ दिवसांत १० गोळ्या खाल्ल्या. परिणामी धुरी यांची तब्येत खालावून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी औषध दुकानदारांने चुकीची औषध दिल्यानं औषध विक्रेत्याला एफडीएनं दोषी ठरवलं. एवढंच नव्हे, तर या दुकानात फार्मासिस्ट नसल्याचंही समोर आलं आहे.


परवाना रद्द, विक्रेत्याला अटक

त्यानुसार मार्चमध्ये कल्पेश मेडिकल स्टोअर्सचा औषध दुकानाचा परवाना एफडीएनं रद्द केला. सोबतच या औषध विक्रेत्याविरोधात औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी महिन्याभरापूर्वी एफडीएने गुन्हा दाखल केल्याची माहिती डी. आर. गहाणे, सहआयुक्त (बृहन्मुंबई), औषध, एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर मालाड पोलिसांनी पुढील कारवाई करत २ दिवसांपूर्वी औषध विक्रेता कल्पेश व्यास याला अटक करत न्यायालयात हजर केलं. त्याला न्यायालयानं जामिन दिला असून आता पुढील तपास पोलिस करत असल्याचंही गहाणे यांनी स्पष्ट केलं.


औषधे खरेदी करताना घ्या काळजी

या प्रकरणानंतर औषध खरेदी करताना किती काळजी घ्यायला हवी हे प्रकर्षानं समोर आलं आहे. तेव्हा रूग्णांनो-ग्राहकांनो औषधं अधिकृत दुकानातूनच, डाॅक्टरांच्या सल्ल्यानं-प्रिस्किप्शन घेतच घ्या. फार्मासिस्ट असलेल्या दुकानातूनच औषधं घ्या. औषध घेतल्यानंतर त्याचं बिल घ्या, डाॅक्टरांना स्पष्ट अक्षरात, कॅपिटल लेटरमध्ये औषधांची नावं लिहून देण्याचा आग्रह डाॅक्टरांकडे करा.

तसंच औषधं खरेदी केल्यानंतर औषध डाॅक्टरांना दाखवा आणि त्यानंतरच डाॅक्टराच्या सल्ल्यानं औषधांचं सेवन करा. महत्त्वाचं म्हणजे औषधांवरील सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा, औषधाची मुदत तपासून घ्या असं आवाहन गहाणे यांनी केलं आहे.



हेही वाचा-

मॉडेल प्रिस्क्रिप्शनची ऐशीतैशी

मेडिकलमधून हव्या तितक्याच गोळ्या घ्या, सक्ती केल्यास तक्रार करा!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा