Advertisement

मेडिकलमधून हव्या तितक्याच गोळ्या घ्या, सक्ती केल्यास तक्रार करा!

पूर्ण पाकिटच घेण्याची सक्ती केमिस्टकडून केली जाते. त्यामुळए, नाईलाज म्हणून आपल्याला आख्खं पाकिट घ्यावं लागतं, आणि अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पण आपल्यापैकी अनेकांना हे माहितच नसतं, की डॉक्टरनं लिहून दिल्या, तेवढ्याच गोळ्या देणं केमिस्टवर बंधनकारक आहे!

मेडिकलमधून हव्या तितक्याच गोळ्या घ्या, सक्ती केल्यास तक्रार करा!
SHARES

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तेवढ्याच गोळ्या द्यायला अनेकदा केमिस्ट नकार देतो. अशावेळी पूर्ण पाकिटच घेण्याची सक्ती केमिस्टकडून केली जाते. त्यामुळए, नाईलाज म्हणून आपल्याला आख्खं पाकिट घ्यावं लागतं, आणि अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पण आपल्यापैकी अनेकांना हे माहितच नसतं, की डॉक्टरनं लिहून दिल्या, तेवढ्याच गोळ्या देणं केमिस्टवर बंधनकारक आहे!


परवाना रद्द करण्याची तरतूद

याबाबतचा कायदाच अस्तित्वात असून जर केमिस्टने या कायद्याचे उल्लंघन केले, तर त्याच्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. या कायद्यानुसार अगदी संबंधित केमिस्टचा परवाना किंवा नोंदणी रद्द करण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे अशा केमिस्टबाबत तुम्ही थेट एफडीएकडे तक्रार करू शकता. एफडीएकडे लेखी तक्रारीसह एफडीएच्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधूनही तक्रार नोंदवता येते.


संपूर्ण पाकिट घ्यायची सक्ती का?

अनेकदा डॉक्टर ५ किंवा १० गोळ्याच लिहून देतात. पण केमिस्टकडून मात्र रूग्णांना २० किंवा ३० गोळ्यांचं आख्खं पाकिटच घ्यायची सक्ती केली जाते. पण औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यातील तरतुदीनुसार डॉक्टरांनी लिहून दिल्या तितक्याच गोळ्या देणं केमिस्टवर बंधनकारक आहे.

नोंदवलेल्या तक्रारीनुसार एफडीए संबंधित केमिस्टला कारणे दाखवा नोटीस पाठवून ठराविक वेळेत केमिस्टकडून स्पष्टीकरण मागवते. केमिस्टचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्या केमिस्टचा औषध विक्रीचा नोंदणी-परवाना निलंबित करू शकते वा कायमस्वरूपी रद्दही करू शकते

अर्जुन खडतरे, सहआयुक्त (औषध), बृहन्मुंबई, एफडीए

एकीकडे तक्रार आणि कारवाईची तरतूद असताना केमिस्ट्सचं मात्र वेगळंच दुखणं आहे. प्रिस्क्रिप्शननुसार गोळ्या दिल्या तरी आणि नाही दिल्या तरी आमचेच नुकसान असल्याचे केमिस्ट सांगत आहेत. डॉक्टरांनी प्रिस्काईब केल्याप्रमाणेच गोळ्या देण्याच्या नियमांचे पालन बऱ्याच औषध विक्रेत्यांकडून होते. मात्र, त्यात विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.


केमिस्टचं दोन्ही बाजूंनी नुकसान?

औषध कंपन्यांकडून १४, २८ आणि ३० गोळ्यांच्या स्ट्रिप तयार केल्या जातात. कुठल्या आजारासाठी किती गोळ्यांची गरज असते? डॉक्टर किती डोस घ्यायला सांगतात? हे माहित असतानाही कंपन्यांकडून ३० गोळ्यांपर्यंतच्या स्ट्रिप बाजारात आणल्या जातात. तर महत्त्वाचे म्हणजे स्ट्रिपच्या एका कोपऱ्यात औषधाचे नाव आणि औषधांची एक्सपायरी डेट असते. अशा वेळी गोळ्या कापून दिल्यानंतर उरलेल्या गोळ्यांवर औषधाचे नावही नसते आणि एक्सपायरी डेटही नसते आणि मग दुसरा रूग्ण-ग्राहक अशा अर्धवट स्ट्रिपमधील गोळ्या घ्यायला नकार देतात. या अर्ध्या गोळ्यांची स्ट्रिप कंपनीही परत घेत नाही. त्यामुळे दोन्हीकडून विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे सदस्य आणि औषध विक्रेते शशांक म्हात्रे यांनी दिली आहे.

या धर्तीवर फार्मासिस्ट असोसिएशनने ५ ते १० गोळ्यांच्या स्ट्रिप कंपन्यांनी तयार कराव्यात, अशी मागणी केली आहे. जर स्ट्रिप कमी करणे कंपन्यांना जमत नसेल, तर कंपन्यांनी प्रत्येक गोळीवर औषधाचे नाव आणि एक्सपायरी डेट टाकावी, अशीही मागणी म्हात्रे यांची आहे. यासंबंधी लवकरच एफडीएसह इतर संबंधित यंत्रणांना पत्र लिहून ही मागणी ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

दोन वर्षात मुंबईत फक्त ८ जनऔषधी केंद्र, जनऔषधी योजना परवडेना?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा