Advertisement

कोरोना रुग्णांचं मानसिक आरोग्य तपासणार

प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्या विभागानं काही मार्गदर्शक तत्त्व सूचित केले आहेत.

कोरोना रुग्णांचं मानसिक आरोग्य तपासणार
SHARES

प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्या विभागानं काही मार्गदर्शक तत्त्व सूचित केले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी आरोग्य विभागानं समिती गठित केली होती. या समितीनं नुकतीच ही मार्गदर्शक तत्त्वं शासनाला सादर केली असून, त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले आहेत.

कोरोनाबाधित मनोरुग्णांचं निदान करण्यासाठी डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे आदेश देखील या मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आले आहेत. रुग्णालया व्यतिरिक्तही उपचार घेत असलेल्या प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची तपासणी करून मानसिक समस्या आहेत का याची पडताळणी केली जावी. असं रुग्ण आढळल्यास तातडीने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवावे. तज्ज्ञांनी अशा मनोरुग्णांसाठी स्वतंत्र उपचार पद्धतीचं नियोजन करावं. तसेच प्रत्येक रुग्णाच्या मानसिक आरोग्याची तपासणी, उपचार आणि इतर वैयक्तिक माहितीची मानसोपचारतज्ज्ञांनी नोंद ठेवावी; जेणेकरून उपचारादरम्यान किंवा त्यानंतरही संपर्क साधणे शक्य होईल असे सूचित केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी रुग्णालयात मानसोपचार किंवा मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक रुग्णांचे आठवड्यातून एकदा रुग्णांना समुपदेशन करावं. मनोरुग्णांचं निदान करण्यासाठी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करावं. रुग्णांसाठी योग प्रशिक्षण ही उपलब्ध करावं. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून निधीचा पुरवठाही केला जाणार असल्याचं समजतं.

कोरोनामुळं मानसिक तणावाखाली येऊन अनेक रुग्ण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं या आधी आत्महत्येचा प्रयत्न केलेले किंवा तसे विचार येत असलेल्या रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करून तपासणी केली जावी. मानसोपचारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जावेत. तसेच यांच्यावर सातत्यानं देखरेख करावी. कात्री, ब्लेड इत्यादी धोकादायक वस्तू त्यांच्याजवळ ठेवू नयेत. कोणतीही औषधे त्यांच्याजवळ न ठेवता देखरेखीखाली दिली जावीत. अशा रुग्णांच्या खोलीत खिडक्यांना जाळी असावी. तसेच दरवाज्यांना कड्या नसाव्यात. रुग्ण पळून जाणार नाही यासाठी बाहेरून दरवाजा बंद करण्याची सोय असावी. रुग्ण शौचालयात जाताना त्यांच्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्याने जावे, असे यात नमूद केले आहे.

कोरोना काळात ज्येष्ठ नागरिक, बालकं आणि गरोदर मातांमध्ये मानसिक ताण निर्माण होण्याचा संभव अधिक असल्यानं या वर्गात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यावर भर द्यावा. रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ नसल्यास खासगी तज्ज्ञांची नेमणूक करण्याचे अधिकार दिले असून, त्यांचं मानधन कोरोनानिधीतून देण्यात येणार आहे.

गेले अनेक महिने सातत्याने सेवा देत असलेले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी यांच्यात कामाच्या अति तणावामुळे मानसिक ताण-तणाव  किंवा तत्सम आजार निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून काही खबरदारीचे उपाय योजले जातील किंवा त्यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा