Advertisement

काळजी घ्या! मुंबईत तापाचे 9,431 रुग्ण


काळजी घ्या! मुंबईत तापाचे 9,431 रुग्ण
SHARES

कधी ऊन तर कधी पाऊस... असेच सध्या मुंबईतील वातावरण आहे. त्यामुळे साथीचे आजार आणि तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाने जरी दडी मारली असली तरी, त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे.

ऑगस्ट महिन्यात तापाचे तब्बल 9 हजार 431 रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. त्यातील, 1 हजार 936 डेंग्यू आणि डेंग्यूसदृश्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच स्वाईन फ्लू आणि डेंग्यूमुळे प्रत्येकी दोन, तर मलेरिया आणि लेप्टोमुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 


महापालिकेचे आवाहन

महापालिकेच्या आरोग्य खात्याने मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच जराही ताप आल्याचे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.


ऑगस्टमध्ये इतके बळी...

स्वाईन फ्लूमुळे कुर्ल्यातील 36 वर्षांच्या महिलेचा 7 ऑगस्टला तर, मालाड येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा 12 ऑगस्टला मृत्यू झाला. डेंग्यूमुळे ग्रँटरोड येथील 20 वर्षीय मुलाचा 13 ऑगस्टला तर, जोगेश्वरी येथील 79 वृद्धेचाही डेंग्यूने बळी गेला. याव्यतिरिक्त माटुंगा येथील कामगार वसाहतीतील 29 वर्षीय तरुणीचा 22 ऑगस्टला मलेरियामुळे मृत्यू झाला. तर, 4 ऑगस्टला लेप्टोमुळे 49 वर्षीय बोरीवलीतील व्यक्तीचा मृत्यू झाला.

ऑगस्ट महिन्यात कॉलराचे रुग्णदेखील आढळून आले आहेत. त्यातील दोन धारावी, एक चेंबूर आणि एक मानखुर्दमधील आहेत. या महिन्यांत आजाराने ओढावलेल्या मृत्यूनंतर, शहर-उपनगरांतील 2 हजार 770 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 12 हजार 104 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

याचसोबत उंदीर पकडण्याची मोहीमही राबवण्यात आली. ही मोहीम 124 घरांमध्ये राबवण्यात आली. त्यात 75 ठिकाणी 75 बिळे आढळून आली. तीन सापळ्यांत दोन उंदीर पकडण्यात आले, तर 47 बिळांमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकण्यात आले.



हेही वाचा - 

मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा