समोर कुठलंही संकट असो आई आपल्या मुलांना त्याची साधी झळही लागू देत नाही. मुलांसाठी आयुष्य वेचणारी जननी म्हणूनच मुलांसाठी तारणहार ठरते. अशाच एका आईने दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या ९ महिन्यांच्या बाळाला यकृत दान करून त्याचे प्राण वाचवले आहेत.
पालघर इथं राहणारे विवेक राऊत आणि निशा राऊत या दाम्पत्याला काव्य नावाचं ९ महिन्यांचं बाळ आहे. या बाळाची शारीरिक स्थिती जन्मापासूनच नाजूक होती. त्याला 'लिव्हर सिऱ्हॉसिस' आजार झाल्याने त्याची वाढ खुंटली होती. या आजारामुळे बाळाचं वजन ५.६ किलोपर्यंत येऊन थांबलं होतं. त्यानंतर त्याला कावीळ होऊन त्याच्या पोटात पाणी साचलं आणि सोबतच त्याला दोन प्रकारचे प्राणघातक संसर्गही झाले.
शिवाय काव्यला बिलिअरी आर्टेसिया हा दुर्मिळ आजारही झाला होता. या आजारामध्ये यकृतापासून आतड्यांपर्यंत पित्त वाहून नेणारी नलिकाच अस्तित्वात नसते. काव्य २ महिन्यांचा असताना त्याच्यावर मुंबईतील एका रूग्णालयामध्ये पोर्टो-एंटरेस्टॉमी नावाची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे काव्यचं यकृत कायमचं खराब झालं. त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याने त्याला मुंबईतील वोक्खार्ट रुग्णालयात हलवण्यात आलं.
वैद्यकीय चाचण्यांमध्ये काव्यला यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचं डॉक्टरांनी काव्यच्या पालकांना सांगितलं. तेव्हा क्षणाचाही विचार न करता काव्यची आई निशा यांनी आपल्या यकृताचा काही भाग देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अॅबडॉमिनल अवयव प्रत्यारोपण आणि एचपीबी शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखालील डाॅक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेलं पश्चिम भारतातील हे सर्वात लहान बाळ ठरलं. काव्यवर १४ जून २०१८ रोजी १४ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर झाली असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.
यासंदर्भात डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले, काव्यची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. ९ महिन्यांच्या बाळाचे अवयव पूर्णपणे विकसित नव्हते म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं आमच्यासाठी मोठं आव्हान होतं.
"आम्ही काव्यच्या आईच्या यकृताचा अत्यंत छोटा भाग विलग केला. त्याचं वजन २६० ग्रॅम होतं. पण तेवढा भागसुद्धा बाळासाठी खूप मोठा होता. त्यामुळे एक विशिष्ट तंत्र वापरून आम्ही तो भाग अजून कमी करून २१० ग्रॅमपर्यंत आणला. त्यानंतर हे यकृत काव्यच्या शरीरात प्रत्यारोपीत करण्यात आलं आणि अत्यंत लहान रक्तवाहिन्यांना (३-५ मिमी व्यास) जोडण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर काव्यला स्थिर पण नाजूक अवस्थेत पीआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. काव्याच्या आईची प्रकृतीही सध्या स्थिर आहे." अशी माहिती श्रीमल यांनी दिली.
हेही वाचा-
मृत्यूनंतर अवयवदानातून वाचवले दोघांचे प्राण
२२ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान