Advertisement

नागरिकांना गूगल मॅपवर मिळणार प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

नागरिकांना गूगल मॅपवर मिळणार प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती
SHARES

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची अद्ययावत माहिती यापुढे गूगल मॅपवर (google map) मिळणार आहे. कोरोना जागतिक महामारीच्या काळात मुंबई महापालिकेने (bmc) या प्रकारचा प्रयोग केला आहे.

मुंबई महापालिकेनं सर्वात प्रथम हा प्रयोग केला असून, इतर ठिकाणीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अवाढव्य मुंबई महानगरात अशा प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना ठाऊक असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून नियमितपणे प्रकाशित करण्यात येते. तरीही प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सहजसोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, त्याची व्यापकता वाढावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने गूगल मॅपची मदत घेऊन प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती गूगलवर दिली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित ही सेवा उपलब्ध करून देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेला गूगलने पूर्ण सहकार्य केले असून त्याचा मोबदलाही घेतलेला नाही. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून वेळोवेळी पुरवल्या जाणाऱ्या अद्ययावत माहितीनुसार हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहाता येणार आहेत.

मोबाइलवर गूगल मॅप हे अ‍ॅप्लिकेशन सुरू केल्यानंतर ‘कोविड १९ इन्फो’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मुंबई महानगराचा नकाशा ‘झूम’ करून पाहाताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात व कोविड १९ कन्टेनमेंट झोन या उपशीर्षकासह दिसू लागतात. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. यामुळे आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही, असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे, हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे.

नुकतीच ही सुविधा सुरू झाली असून त्यामध्ये वेळोवेळी बदल केले जाणार आहेत. भूगोल जीआयएस आणि जेनेसीस यांचाही महानगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये हातभार लागला आहे. गूगल मॅपवर ‘कोविड १९ इन्फो’  हा पर्याय निवडल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका या पर्यायावर क्लिक केले तर थेट महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर stopcoronavirus.mcgm.gov.in या पृष्ठावर करोनाविषयक संपूर्ण माहितीदेखील पाहाता येते.



हेही वाचा - 

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा