Advertisement

परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईन सक्तीचं

मुंबई विमानतळावर परदेशातून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी यापूर्वी दोनदा नियमावली जाहीर करण्यात आली होती.

परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईन सक्तीचं
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळं महापालिकेनं कडकडीत निर्बंध लावण्यास सुरुवात केली. अशातच आता परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी ही महापालिकेनं सुधारित नियमावली जारी केली आहे. ही सुधारित कार्यपद्धती तात्काळ लागू करण्यात आली आहे. प्रवाशांना विलगीकरणासाठी असलेल्या हॉटेलांमध्ये सोडल्याची पावती बेस्ट चालकानं विमानतळावर सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हॉटेलमध्ये प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई विमानतळावर परदेशातून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी यापूर्वी दोनदा नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे या आदेशान्वये सक्तीचं करण्यात आलं आहे. मुंबई महानगरात निर्देशित केलेल्या हॉटेलमध्ये या प्रवाशांना विलगीकरण कालावधीत राहावे लागते. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना त्यामध्ये विलगीकरणापासून पळवाट शोधून काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करून सुधारित कार्यपद्धती तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आली आहे. या नियमावलीचे कटाक्षानं पालन करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

सुधारित नियमावली काय आहे?

  • विमानतळावर नेमलेल्या पथकानं दररोज आलेल्या प्रवाशांच्या आवश्यक त्या संपूर्ण माहितीसह मुंबईतील २४ विभाग कार्यालयनिहाय यादी तयार करून संबंधित विभागांचे साहाय्यक आयुक्त/ कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना ई-मेलनं पाठवावी.
  • विमानतळाबाहेरील पथकानं संबंधित प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या हॉटेलमध्ये आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी नेमलेल्या बेस्ट बसमधून नेण्याची व्यवस्था करावी. बेस्ट बसच्या चालकास प्रवाशांची यादी सुपूर्द करावी.
  • बेस्ट बसचालकानं प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या हॉटेलमध्येच नेऊन सोडावे आणि प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचल्याची पावती त्या-त्या हॉटेलकडून घ्यावी आणि सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये पोहोचविल्याची पावत्या बेस्ट बस चालकानं विमानतळावर परतल्यानंतर विमानतळ समन्वय अधिकाऱ्यास सुपूर्द करावी.
  • विमानतळ समन्वय अधिकाऱ्यानं प्रवासी आपापल्या हॉटेलमध्ये पोहोचल्याची पावती आणि विमानतळाच्या आतील पथकाने बनविलेली प्रवाशांची यादी यांची फेरपडताळणी करून सर्व प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचल्याची खातरजमा करावी.
  • संबंधित विभाग कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागाच्या कार्यक्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणासाठी निर्देशित केलेल्या हॉटेलमध्ये विलगीकरणासाठी पाठवलेले प्रवाशी प्रत्यक्षात राहात असल्याची वेळोवेळी खातरजमा करता यावी यासाठी तपासणी पथकांची नियुक्ती करावी. प्रत्येक प्रवाशाच्या विलगीकरण कालावधीमध्ये किमान दोनदा तपासणी करणे आवश्यक असेल.
  • विलगीकरणाशी संबंधित कोणत्याही नियमाचे अथवा निकषाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले तर साहाय्यक आयुक्त अथवा त्याच्या प्रतिनिधीने साथरोग नियंत्रण कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यातील तरतुदींच्या आधारे योग्य आणि कठोर कारवाई करावी.



हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा