Advertisement

आता फक्त ५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत.

SHARES

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट १५० रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान ५ ते ६ वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन ४५०० रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणं खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

'असे' असतील दर

यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या (covid19 test) दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर करण्यात आले होते. निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणं या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये आकारले जातील.

हेही वाचा- कोरोना रुग्णासाठी बेड पाहिजे?, 'या' नंबरवर त्वरीत संपर्क साधा

रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणं यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नमूद केलं आहे.

'या' चाचण्यांसाठीही दर निश्चित

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा ३ टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

तपासणी खर्च कमी झाला

या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसंच आयसीएमआरने  विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचं नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणं आवश्यक असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

(now RT PCR test will available in 500 rupees only in maharashtra says rajesh tope)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा