Advertisement

कॅन्सर आणि हृदयरोगावरील औषधं झाली स्वस्त, ५३ टक्क्यांपर्यंत किंमती घटल्या

५१ औषधांच्या किंमती ६ ते ५३ टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत एनपीपीएने कॅन्सर आणि हृदयरोगाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना मोठा दिलासा दिला आहे. कमी करण्यात आलेल्या औषधांमध्ये पेनकिलर आणि त्वचेच्या विकारांवरील औषधांचाही समावेश आहे.

कॅन्सर आणि हृदयरोगावरील औषधं झाली स्वस्त, ५३ टक्क्यांपर्यंत किंमती घटल्या
SHARES

कॅन्सर, हृदयरोगासह अन्य काही आजारांवरील एकूण ५१ औषधांच्या किंमती नॅशनल फार्मास्युटिकल प्राइझिंग अथॉरिटी (एनपीपीए)ने गुरूवारी नियंत्रित केल्या आहेत. या ५१ औषधांच्या किंमती ६ ते ५३ टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत एनपीपीएने कॅन्सर आणि हृदयरोगाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना मोठा दिलासा दिला आहे. कमी करण्यात आलेल्या औषधांमध्ये पेनकिलर आणि त्वचेच्या विकारांवरील औषधांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत त्वचेच्या विकारांमध्येही वाढ होत असल्याने अशा रूग्णांसाठीही हा मोठा दिलासा ठरणार आहे.

औषध कंपन्या नफा कमावण्यासाठी आव्वाच्या सव्वा दर लावत रूग्णांची लूट करत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. तर त्याचवेळी औषधे परवडत नसल्याने रूग्णांची परवड होत असल्याचेही चित्र आहे. हीच बाब लक्षात घेत गेल्या काही वर्षांपासून एनपीपीएकडून महत्त्वाच्या औषधांच्या किंमती नियंत्रित केल्या जात आहेत.

आतापर्यंत अंदाजे ८७४ औषधांच्या किंमती कमी करत एनपीपीएने रूग्णांना दिलासा दिला आहे. त्यातही स्टेण्टच्या नावाखाली हृदयरोग्यांची मोठी लूट केली जात होती. २५ ते ३० हजारात उपलब्ध होणारे स्टेण्ट दीड ते अडीच लाखांत विकले जात होते. तर गुडघ्याच्या प्रत्यारोपणासाठीच्या उपकरणाच्या विक्रीतूनही कंपन्या आणि डॉक्टर रूग्णांना लुटत होते. त्यामुळे स्टेण्टसह गुडघ्याच्या प्रत्यारोपणासाठीच्या उपकरणाच्या किंमतीही एनपीपीएने कमी करत कंपन्यांना दणका दिला आहे.


किंमती कमी झालेली काही औषधे...

  • ऑक्सालिप्लेटिन इंजेक्शन (१०० एमजी) - आतड्यांच्या कॅन्सरवरील औषध
  • रूबेला मिजलेस व्हॅक्सिन
  • सेवो फ्लुरेन - भूल देण्यासाठीचे औषध
  • फायटो मेनाडिओन- विटामिन के-१ - रक्त गोठण्यासाठीचे औषध
  • बीसीजी व्हॅक्सिन - टीबीच्या आजारावरील लस


या आजारांवरील औषधे खूपच महाग आहेत. त्यामुळे गरीब रूग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे. पण आता केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलत या आजारांवरील औषधांच्या किंमती कमी केल्याने रूग्णांना योग्य उपचार मिळतील.

डॉ. विजय सुरासे, हृदयरोग तज्ज्ञ


हृदयरोगाचा आजार म्हणजे श्रीमंतांचा आजार असाच काहीसा समज आजही अनेकांचा आहे. पण आजार काही कुणाचा खिसा बघून येत नाही. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सर आणि हृदयरोगासारखे आजार आणि पर्यायाने रूग्ण वाढत असून हे आजार गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत कुणालाही होत आहेत.



हेही वाचा

सर्व औषधांच्या किंमतीवरुन जीएसटी कमी करा- एफएमआरआयएची मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा