Advertisement

टीका करताय? पण एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या, सायन रुग्णालयातील परिचारिकेचं मनोगत...

सायन रुग्णालयातल्या अधिपरिचारिका सीमा राजेश कांबळे यांनी पोस्टद्वारे आरोग्य विभागाशी निगडीत सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

टीका करताय? पण एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या, सायन रुग्णालयातील परिचारिकेचं मनोगत...
SHARES

चीनच्या वुहांग या शहरातून पसरलेला कोरोनाव्हायरस सध्या देशभरात हाहाकार माजवत आहे. इतर देशांप्रमाणे भारत देखील कोरोनाशी दोन हात करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तरीही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळले आहेत. पण या सर्व परिस्थितीचा सामना डॉक्टर, परिचारीका, पोलिस आणि सफाई कर्मचारी मोठ्या हिंमतीनं करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून ते स्वत:ची ड्युटी करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना साथ देणं राहिलं बाजूला काही ठिकाणी त्यांना टार्गेट केलं जातंय.   


रुग्णालयातील 'ते' व्हारल व्हि़डिओ

काही दिवसांपूर्वी सायन आणि केईएम रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका व्हिडिओमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून तसाच ठेवण्यात आला होता. बाजूलाच दुसऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. तर दुसऱ्याएका व्हिडिओमध्ये एकाच बेडवर दोन-दोन रुग्णांवर उपचार केले जात होते.


'अशी' वेळ का यावी?

खरंतर हा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वात प्रथम माझ्यासारखं तुम्हालाही राग अनावर झाला असेल. हॉस्पीटलच्या नावानं आणि तिथं काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसच्या नावानं खडे फोडून देखील झाले असतील. तुम्ही केला की नाही माहित नाही पण मी शांत डोक्यानं खूप वेळ विचार केला. डोक्यात काही प्रश्न तांडव करत होते. ही वेळ आपल्यावर का यावी? हॉस्पीटल प्रशासनाच्या वागण्यामागे काय कारण असेल? त्यांना काही समस्या येत आहेत का? असे अनेक विचार डोक्यात येत होते. अखेर या प्रश्नाची उत्तरं एका परिचारिकेच्या व्हायरल पोस्टमधून मिळाली. तिनं दिलेली उत्तरं कदाचित आपल्याला माहितही असतील. पण आपल्याला कोण तरी हवं असतं ज्याच्यावर सगळं खापर फोडता येईल...



परिचारीकेचं मनोगत

सायन रुग्णालयातल्या अधिपरिचारिका सीमा राजेश कांबळे यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आरोग्य विभागाशी निगडीत सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यातूनही त्यांची काम करण्याची जिद्द वाखाडण्याजोगी आहे.  परिचारीका दिनानिमित्त (Nurse Day) जाणून घेऊयात त्यांच्या समस्या...   

सीमा कांबळे काय म्हणाल्या?


नमस्कार

मी सायन रुग्णालयातील अधिपरिचरिका...

सायन आणि KEM रुग्णालयातील परिस्थिति मिडियानं ज्याप्रकारे मीठ मसाला लावून दाखवली... फार वाइट वाटलं... असो ती त्यांची रोजी-रोटी आहे... पण ती अवस्था का?? ही सत्यस्थिति जर लोकांपर्यंत पोहोचली असती तर बरं वाटलं असतं... जशी न्यूज व्हायरल झाली प्रत्येकानं आम्हाला फॉरवर्ड करून विचारलं हे खरं आहे का???... आणि आम्हीही न डगमगता उत्तर दिलं... होय हे खरं आहे!!!

पण तुम्हाला महितीये का?? अखंड भारतात KEM आणि सायन ही दोन रुग्णालये नामवंत आहेत. बॉम्ब ब्लास्ट असो, 93 च्या दंगली असो वा २६ जुलैचा पाऊस... असे अनेक प्रसंग याच रुग्णालयांनी उत्तम प्रकारे सांभाळले आहेत आणि आता COVID सारख्या महमारिमध्ये देखील ते तितकेच सज्ज आहेत...

या दोन रुग्नलयांवर किती ताण आहे याचा कधी आराखडा तरी तुम्ही घेतलाय???

रोज असे कित्येक रुग्ण आम्ही बघतोय जे इथल्या सुविधा घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन येतात आणि बरे होऊन आपापल्या मायदेशी परत जातात... ही दोन रुग्णालये आहेत म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय लोक उपचार घेऊ शकतात... अन्यथा खाजगी रुग्णालयाची परिस्थिति सर्वांनाच अवगत आहे.

आज २-४ मृतदेह काय दिसले किंवा एका बेडवर २ रूग्ण काय दिसतात, लगेच न्यूज भेटली आणि ती व्हायरल पण झाली.... हव्या तश्या कमेंट्सकरून पण मोकळे झाले...

पण ते २ रूग्ण एका बेडवर का असतील??? असा विचार नाही आला मनात कधी???...अहो आम्हाला पण हौस नाहिये एका बेडवर दोन रूग्ण ठेवायची आणि दुप्पट कामे करायची...

देशातील एक नंबरची झोपड़पट्टी "धारावी"...!

सगळ्यात जास्त COVID 19 रूग्ण कुठे? तर धारावीत... नुसतेच COVID नाही तर सगळ्याच आजारांचे सगळ्यात जास्त रूग्ण धारावित असतात...आणि असच नाही तर गेल्या १५ वर्षांच्या अनुभवावरुन मी हे ठाम पणे सांगतेय... मग हे रूग्ण उपचारसाठी जाणार कुठे??? सायन रुग्णालया मधेच ना??

आता विषय येतो COVID 19 चा...खरे तर तुमच्या माहितीसाठी सायन आणि KEM ही दोन्हीही रुग्णालये Non-COVID 19 आहेत... परिणामी बाकीच्या आजारांचे सर्व रूग्ण दाखल होणार इथेच... आणि बाकीचे COVID रुग्णालये ही पूर्णपणे भरलेली असल्यानं COVID positive रुग्णांवर देखील नाइलाजानं इथेच उपचार करावा लागतो... जागा नाहिये म्हणून रूग्ण परत पाठवायची परवानगी देखील या रुग्णालयांना नाहिये... रोजची डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत, अक्षरशः डॉक्टरांसमोर नातलग केविलवाणे चेहरे करुन, हात जोडून विनंती करत असतात... जागा नाहिये हे माहित असताना देखील जमिनीवर झोपून उपचार करून घेण्यास ते तयार असतात... कारण त्यांची परिस्थिती नसते बाहेर जाऊन उपचार करून घेण्याची...

आता याला माणुसकी म्हणावी की हलगर्जिपणा हे पूर्णता तुमच्या विचार शैलीवर निर्भर करतं....

 "Dead bodies"

आता विचार करा सर्वतोपरी प्रयत्न करूनही अशा परिस्थितीत जर बेडवर रूग्ण मरण पावतो तर त्याची सर्व फॉर्म्यूलिटिज पूर्ण होईपर्यंत dead body ठेवणार कुठे??? जिथे रुग्णांसाठीच जागा अपुरी पडतेय...!!

आणि हो रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातलगांकडे मृतदेह सुपूर्द करेपर्यंत जी प्रक्रिया असते ना ती शब्दात सांगणं देखील शक्य नाहिये... आणि सांगून तुम्हाला ती कळणार पण नाही....

असो, आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आमचे कर्त्तव्य जबाबदारीनं पार पाडतोय... यात आमची आणि आमच्या परिवाराची काय हानी होतेय ते फक्त आम्हालाच माहित... तुम्ही करा तुमचे काम.. उद्या अजुन काहीतरी न्यूज तयार ठेवा... पण तरीही आम्ही न डगमगता आमचे कर्तव्य करण्यास सक्षमच असणार...

आणि ही महाराष्ट्रातील यशस्वी रुग्णालये म्हणून कालही होती, आजही आहेत आणि उद्याही असणार...

बघा जमलेच तर पोस्टवर विचार करा आणि नाहीच जमत असेल तर वाह्यात comments पण करू नका...

धन्यवाद

सीमा राजेश कांबळे

अधिपरिचारीका

सायन


समस्यांचं मुळ काय?

खरंतर सीमा यांची ही पोस्ट सत्य आणि कटू आहे. पण हीच परिस्थिती आहे. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की, लोकसंख्येवरील ताण किती वाढत आहे. लोकसंख्या पाहता रुग्णालये आणि इतर आरोग्य सुविधा कमी पडत आहेत.  डॉक्टर, नर्सेस यांची देखील भरती केली जात नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर ताण वाढतोय. त्यात खाजगी रुग्णालयांची फी परवडत नसल्यानं अधिक बोजा सरकारी रुग्णालयांवर येतो. पण यासर्वांचा विचार केलाच जात नाही. पण आता वरच्यावर वर विचार न करता विषयाच्या मुळापर्यंत जाऊन विचार करण्याची आवश्यक्ता आहे आणि हा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे.  


नाण्याच्या दोन बाजू

राहिला प्रश्न न्यूज चॅनलचा तर सद्य परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे त्यांचं काम आहे. न्यूज चॅनल्स दोन्ही बाजू जाणून परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतील. पण विचार करणं हे तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. शेवटी प्रत्येक नाण्याच्या दोन हाजू असतात. एकच बाजू पाहून निर्णय घेऊ नका, इतकंच म्हणता येईल...   



हेही वाचा

'कोरोना'मुक्ती लढ्यातील 'परिचारिकां'ची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल - अजित पवार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा