SHARE

मुंबईवरील ओखी वादळचा धोका टळला असला, तरी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि संसर्गाचा धोका मात्र वाढला आहे.


तापामानात घट

केरळ आणि तामिळनाडूला झोडपून काढल्यानंतर कोकण किनारपट्टीकडे सरकलेल्या ओखी वादळामुळे मुंबईत सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी दिवसभर पावसाने दमदार बॅटिंग केली. आता वादळाचे सावट दूर झाले असून पावसानेही विश्रांती घेतली आहे. पण मागील दोन दिवस पडलेल्या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाल्याने साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.


साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता

विशेष म्हणजे मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या वातावरणात विषाणू अधिक काळ तग धरून ठेवतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढण्याची अधिक शक्यता असते. मागील काही महिन्यांपासून मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे आजार बळावण्याची भीती वाढली आहे.


व्हायरल तापाची लक्षणं

  • अंग दुखणं
  • कधीही ताप येणं
  • भूक मंदावणं
  • घसा आणि डोळे दुखणं
  • हातापायांचे सांधे दुखणं


अशी घ्या काळजी...

  • ताप आल्यास सर्वात आधी डॉक्टरांकडे जा
  • रस्त्यावरचं खाणं टाळा
  • गर्दीच्या ठिकाणी जास्त फिरू नका
  • मास्क वापरा
  • डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधं घ्या


संबंधित विषय
ताज्या बातम्या