Advertisement

'या' कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात १ वर्षाची वाढ


'या' कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात १ वर्षाची वाढ
SHARES

सेवानिवृत्त होणारे डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर आणि डीन, प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात १ वर्षाची वाढ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यासंदर्भातील २ प्रस्तावांना स्थायी समितीच्या बैठकीत विना चर्चा मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं डॉक्टर, प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, डीन, डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक बनण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

८ जानेवारी रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात १ वर्षाची वाढ करण्यास आणि त्याबाबत आयुक्तांनी स्थायी समितीला डावलून परस्पर आपल्या अधिकारात घेतलेल्या निर्णयाला आणि त्यासंदर्भातील कार्योत्तर मंजुरीसाठी आलेल्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला होता. मात्र, आज सदर प्रस्ताव विनाचर्चा मंजूर झाल्यानं पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळं रुग्णालयात डॉक्टरांची तर पालिका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची कमतरता भासत असल्याचं कारण देत पालिका प्रशासनाने वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ५९ एवढे करण्याचा परस्पर निर्णय घेतला.

त्यासंबंधित कार्योत्तर मंजुरीसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या ८ जानेवारीच्या बैठकित मंजूर न करता राखून ठेवण्यात आला होता. त्यावेळी या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना, भाजप, काँग्रेस आदी पक्षाच्या गटनेत्यांनी व सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, आज यासंदर्भातील प्रस्ताव बिनविरोध मंजूर करण्यात आला.

रुग्णालय डीन, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६३ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासंदर्भातील प्रस्ताव विना चर्चा आणि बिनविरोध मंजूर करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा