Advertisement

तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण केंद्र, १०० ट्रान्सजेंडरचं पहिल्या दिवशी लसीकरण

एलजीबीटी समुदायासाठी उघडलेल्या पहिल्या लसीकरण केंद्रात १०० हून अधिक ट्रान्सजेंडरचं लसीकरण करण्यात आलं.

तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण केंद्र, १०० ट्रान्सजेंडरचं पहिल्या दिवशी लसीकरण
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (बीएमसी) मंगळवारी एलजीबीटी समुदायासाठी उघडलेल्या पहिल्या लसीकरण केंद्रात १०० हून अधिक ट्रान्सजेंडरचं लसीकरण करण्यात आलं. विक्रोळी पश्चिमेतील सेंट जोसेफ शाळेत हे केंद्र एलजीबीटी समुदायाच्या सदस्यांसाठी उघडण्यात आलं आहे. ज्यांना लस घेण्यात अडचणी येत होत्या अशा ट्रान्सजेंडरसाठी हे फायदेशीर ठरेल.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ओळखपत्र नसलेले ट्रान्सजेंडर लसीकरण करण्यासाठी या केंद्रावर येऊ शकतात. पहिल्या दिवशी, एलजीबीटी समाजातील १०० हून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.

“लसीकरण मोहिमेअंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेणं हे आमचं ध्येय आहे. पालिकेनं या केंद्राची सुरुवात करणं म्हणजे ट्रान्सजेंडरपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम आहे. ज्यांना एलजीबीटी समुदायाला लसीकरणासाठी मदत करायची आहे, ते मार्गदर्शनासाठी वॉर्ड वॉर रूमशी संपर्क साधू शकतात,” असं पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

हे लसीकरण केंद्र संपूर्णपणे एन विभागाच्या आरोग्य विभागाकडून संचालित करण्यात येणार आहे. त्यासाठी एलजीबीटी समुदायाच्या हितासाठी कार्यरत बिगर शासकीय संस्थांचेही सहकार्य लाभत आहे.

मुंबई महानगरातील तृतीयपंथी आणि एलजीबीटी नागरिकांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यासाठी हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे.

तृतीयपंथी नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत १०० तृतीयपंथी नागरिकांचे कोव्हिड-19 लसीकरण करण्यात आले.

विक्रोळीतील सेंट जोसेफ शाळेतील या विशेष लसीकरण केंद्रासंदर्भात माहिती आवश्यक असल्यास अथवा समस्या असल्यास संबंधित नागरिकांनी एन विभाग वॉर्ड वॉर रुम संपर्क क्रमांक 022 – 21010201 यावर संपर्क साधावा. सदर दूरध्वनी वाहिनी २४ तास कार्यरत असते, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.



हेही वाचा

८८ वर्षांच्या वृद्धानं वैद्यकिय संशोधनासाठी केलं स्किन दान

ठाण्यात महिलांसाठी महिन्यातून एक दिवस विशेष लसीकरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा