Advertisement

रेल्वे स्थानकातील कोरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांचा 'साखळी' खेळ

कोरोनाच्या भीतीनं ही चाचणी टाळण्यासाठी अनेक प्रवासी आता वेगळीच शक्कल लढवत आहेत.

रेल्वे स्थानकातील कोरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांचा 'साखळी' खेळ
SHARES

मुंबईसह राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार व महापालिका विविध उपक्रम हाती घेत आहे. त्यानुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा येथून मेल-एक्स्प्रेसनं मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोनाच्या भीतीनं ही चाचणी टाळण्यासाठी अनेक प्रवासी आता वेगळीच शक्कल लढवत आहेत. ज्या स्थानकात कोरोना चाचणी होते आहे, त्या स्थानक येण्याआधीच उतरण्यासाठी एक्स्प्रेस गाड्यांमधील आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबविली जात असल्याची माहिती समोर येत आहे. 

मागील १०-१२ दिवसांत साखळी खेचून गाडी थांबवण्याचे प्रकार वाढले, असून अशा ६३ घटना उघडकीस आल्या आहेत. ४ राज्यांतून रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना चाचणीचा अहवाल बाळगणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ९६ तास आधी कोरोना चाचणी किंवा राज्यातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यावर प्रवाशांची तपासणी हा नियम आहे.

रेल्वेनं आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांची प्रतिजन चाचणी केली जाते. हे काम त्या त्या महापालिकांकडून सुरू आहे. कोरोनाची बाधा झाल्याचं आढळल्यास प्रवाशाची कोरोना केंद्रात रवानगी करण्यात येते. मात्र, ही चाचणी टाळण्यासाठी काही प्रवासी मेल-एक्स्प्रेस गाड्या संबंधित चाचणी केंद्र  असलेल्या थांब्यावर न उतरता आधीच गाडी थांबवून उतरत आहेत. यासाठी गाड्यांच्या डब्यांमध्ये असलेली आपत्कालीन साखळी खेचली जात असल्याचं निदर्शनास आले आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मागील १० ते १२ दिवसांत नियोजित स्थानक येण्याआधीच साखळी खेचून गाडी थांबवण्याच्या ६३ घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक ३६ घटना पश्चिम रेल्वेवरील आहेत. गुजरात, दिल्ली, राजस्थान येथून मोठ्या संख्येनं प्रवासी पश्चिम रेल्वेच्या बोरिवली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर उतरतात. यात सर्वाधिक ९ घटना बोरिवली स्थानकाजवळ, वापी स्थानकाजवळ ३, मुंबई सेन्ट्रल स्थानकाजवळ ४, बोईसर आणि पालघर स्थानकाजवळ प्रत्येकी ४ घटना, वसई स्थानकाजवळ २ आणि मुंबईबाहेर सुरत स्थानकाजवळही ८ घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

काही प्रवासी नियोजित स्थानक येण्याआधीच उतरून जात असल्याचे सुरक्षा दलाला सांगण्यात आलं आहे. त्यामुळं कोरोना चाचणी टाळण्यासाठीच साखळी खेचण्याचा प्रकार केला जात असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यापाठोपाठ मध्य रेल्वेवरही २७ घटना साखळी खेचण्याच्या घडल्या आहेत. या घटना ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, कसाराजवळ घडल्या आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा