Advertisement

राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण?, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!

राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण?, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!
SHARES

महाराष्ट्रात कोरोना (coronavirus) प्रतिबंधक लसींचा मोठा तुटवडा जावणत असल्याने १८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यातच शहरातील काही नागरिक ग्रामीण भागात जाऊन लस घेण्याचे प्रकार समोर आल्याने तेथील स्थानिकांमधील अस्वस्थता वाढली आहे. हे टाळण्यासाठी राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलं की, सध्या १८-४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण धीम्या गतीने सुरू आहे. राज्यात लशींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर या गतीला वेग देता येऊ शकेल. 

४५ वर्षांवरील लोकांसाठी केंद्राकडून ९ लाख डोस मिळाले होते. हा साठा आता हजारांच्या संख्येत आला आहे. केंद्राकडून ४५ वर्षांवरील लोकांसाठी पुरवण्यात आलेल्या लशींच्या साठ्यात वाढ होण्याची गरज आहे. या वयोगटातील ४ ते ५ लाख लोकांचा दुसरा डोस लशींच्या तुटवड्यामुळे चुकला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा- ४५ वर्षावरील नागरिकांसाठी नवी मुंबई पालिकेचा 'ड्राइव्ह इन लसीकरण' उपक्रम

महाराष्ट्राला (maharashtra) लसींचा साठा अपुरा मिळत असल्याने १८ ते ४४ वयोगटासाठी काही मोजक्या केंद्रांवरच लसीकरण केलं जात आहे. परंतु तिथंही लसींच्या तुलनेत नागरिकांची संख्या जास्त असल्याने गर्दी होत आहे. तर कोविन अॅपवर नोंदणी करून शहरातील काहीजण जवळच्या ग्रामीण भागातील केंद्रावर जाऊन लस घेत आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.  

ही समस्या सोडवण्यासाठी जोपर्यंत मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला या वयोगटातही लसीकरणाची विभागणी करावी का, ३५-४४ या वयोगटातील लोकांना प्राधान्य देता येईल का? सहव्याधी असलेल्यांना कशा रितीने प्राधान्य देता येईल, यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

(planning on step by step covid 19 vaccination for 18 to 44 age group in maharashtra says rajesh tope)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा