'...तर प्रसुतीगृह बंद करा'

 Mumbai
'...तर प्रसुतीगृह बंद करा'

मुंबई महापालिकेतील मोठ्या रुग्णालयांवरील रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी प्रसुतीगृहांसह दवाखान्यांमध्ये सुधारणा करण्याची वारंवार घोषणा प्रशासनाच्यावतीने केली जाते. परंतु अद्यापही प्रसुतीगृहांमध्ये सुधारणा केली जात नसून, वैद्यकीय सुविधांसह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीच कमतरता आहे. त्यामुळे ओशिवरा प्रसुतीगृहामध्येही अशाप्रकारे असुविधाच असल्यामुळे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होते. प्रसुतीगृहांमध्ये वैद्यकीय उपकरणांसह डॉक्टरांची मुबलक सेवा दिली जात नाही तसेच प्रसुतीसाठी महिलांना कुपर रुग्णालयांमध्ये आयत्यावेळी हलवले जात आहे. त्यामुळे जर महापालिकेला स्वत:ची प्रसुतीगृहे सांभाळता येत नसतील तर ती बंद करण्यात यावी,असे सांगत शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी घरचा आहेर दिला.

मुंबईतील प्रसुतीगृह आणि सेंटीनेंटल सेंटर आदी ठिकाणच्या परिचारिकांच्या पदांचे सातत्य राखण्याचा प्रस्ताव आला असता शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी ओशिवरा प्रसुतीगृहातील गैरसोयींचा पाढाच वाचला. या प्रसुतीगृहात नवजात बालकांसाठी निओनेटल व्हेंटीलेटर तसेच काचेच्या पेटींची व्यवस्था नाही. तसेच प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना कुपर रुग्णालयात पाठवले जाते. तसेच नवजात बालकांना कुपरमध्ये पाठवल्यास रुग्णालयाकडून बाळाला प्रवेश दिला जात नाही. तर शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी रावळी प्रसुतीगृहात सोनोग्राफी मशीन आहे, पण कलर डॉपलरच नसल्याची बाब निदर्शनास आणली. याबरोबरच डॉक्टरही नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पदे वाढवूनही याठिकाणी आरोग्य सुविधा चांगल्याप्रकारे मिळेल याची खात्री नसल्याची खंत व्यक्त केली.

मालाड मालवणीतील मौलान अब्दूल आझाद प्रसुतीगृह बंद असल्यामुळे महिलांचे हाल होत असून, तेथील महिलांना केईएम,नायरमध्ये पाठवले जात असल्याची तक्रार काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहाँ सिद्धीकी यांनी केली. वांद्रे पूर्व भागातील प्रसुतीगृहाची वास्तू खासगी विकासकाकडून बांधून मिळाली आहे. परंतु ही जागा ओपीडी चालवण्याच्या लायकीची नाही,अशी खंत माजी उपमहापौर अलका केरकर यांनी व्यक्त केली. तर भायखळ्यात अहिल्याबाई होळकर प्रसुतीगृहाच्या जागेवर कर्करोगाचे रुग्णालय उभारले जात आहे. त्यामुळे याठिकाणी प्रसुतीगृहासाठी किमान ओपीडी सुरु केली जाणार आहे, अशी विचारणा सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली.

यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी,ओशिवरा प्रसुतीगृहात निओ नेटल केअर युनिटची सोय नाही. कुपर रुग्णालयातील गायनॅक विभाग ओशिवरा प्रसुतीगृहात हलवण्यात आला होता. परंतु कुपर रुग्णालय सुरू झाल्यानंतर ते पुन्हा तिथे नेण्यात आले. त्यामुळे तिथे सुविधा नसल्याचे जाणवत असेल, असे दराडे यांनी स्पष्ट केले. एकूण 28 प्रसुतीगृह असून, ती सर्व सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी 5 प्रसुतीगृह चांगल्या दर्जाची बनवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading Comments