Advertisement

कामा रुग्णालयातील रेडिएशन मशीन ९ महिन्यांपासून बंद


कामा रुग्णालयातील रेडिएशन मशीन ९ महिन्यांपासून बंद
SHARES

सीएसएमटी येथील कामा‌ आणि आल्बेस रुग्णालयातील रेडिएशन मशीन गेल्या ९ महिन्यांपासून बंद असल्याचं समोर आलं आहे.

खरंतर या मशीनची वॉरंटी मे २०१८ पर्यंत आहे. पण, तरीही या बंद मशीनचा योग्य पद्धतीने पाठपुरावा केला जात नसल्याचं समजतं. शिवाय, मशीन बंद राहिल्यास दर दिवशी २५ हजार दंड कंपनीला ठोठावण्याची तरतूद आहे. पण, कामा प्रशासन कंपनीला पाठीशी घालत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या सर्व परिस्थितीत कर्करोग ग्रस्त महिला रुग्णांचं मोठं नुकसान होत आहे.


९ महिन्यांपासून मशीन बंदावस्थेत

या रुग्णालयात दररोज ९० महिलांना मोफत कर्करोगासाठी रेडिएशन दिलं जात होतं. पण गेले ९ महिने म्हणजे जूनपासून ही मशीन बंद आहे. ज्यामुळे या रुग्णालयात किमोथेरपीसाठी येणाऱ्या महिलांना टाटा मेमोरियल रुग्णालयात पाठवलं जातं. जिथे आधीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे रुग्णांना रेडिएशन मिळणं कठीण होतं.

कामा रुग्णालयात कर्करोग विभागात येणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यासाठी राज्य सरकारने २०१३ साली स्वित्झर्लंडस्थित मेरीअन या कंपनीकडून रेडिएशन थेरपीसाठी आवश्यक असलेलं यंत्र विकत घेतलं. पण, ही मशीनच बंद असल्याकारणाने त्यांना टाटामध्ये पाठवलं जातं. शिवाय, खाजगी रुग्णालयातही पाठवलं जातं, जिथे ही थेरपी परवडणारी नसते.


सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा पुरस्कार

कामा रुग्णालयाला नुकताच सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून सन्मानपत्र देण्यात आलं आहे. पण, या पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीने कर्करोग विभागाकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. रुग्णांना चांगली सुविधा आणि उपचार यासाठीच या रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून मान देण्यात आला होता.

याविषयी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा