Advertisement

रेडी टू ड्रिंक पिताय? मग हे वाचाच...


रेडी टू ड्रिंक पिताय? मग हे वाचाच...
SHARES

जे डोळ्यांना दिसतं, त्यावर अनेकदा आपण विश्वास ठेवतो. पण अनेकदा रेडी टू ड्रिंक पेयं अारोग्यवर्धक असल्याच्या फसव्या जाहिरातींचा मारा अापल्यावर केला जातो. त्यामुळे असंख्य लोक या बळी पडून हे ड्रिंक पितात. विविध फळांचे, फ्लेवर्सचे ज्यूस, डायट कोक, पल्प्स, कृत्रिम शीतपेयांचं सातत्यानं सेवन केल्यास, आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागेल, यात शंकाच नाही.

विविध सोहळे, समारंभात विशेषतः उन्हाळ्यात कोड्रिंक्स अाणि थंडगार शीतपेये म्हणजे एकप्रकारचा अानंदच. संतुलित आहार घेणाऱे आणि आपलं आरोग्य जपणाऱ्या अनेकांच्या लिस्टमध्ये अशा रेडी टू ड्रिंक फळांच्या रसांचा, तसंच डायट पूरक शीतपेयांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे अनेक जण एनर्जी ड्रिंकलाही पसंती देतात. या सर्व उत्पादनांचे अापल्या अारोग्यावर घातक परिणाम होताहेत, हे तुम्हाला माहितेय का?

कृत्रिम उर्जा प्रदान करणाऱ्या अाणि उत्तेजक पदार्थांच्या सेवनानं कितीतरी घातक द्रव्यं आपल्या पोटात जातात, याची कुणी कल्पनाही केलेली नसेल. पण हे सत्य अाहे. कृत्रिम द्रव पदार्थ बनवण्यासाठी केमिकल, साखर, कार्बोहायड्रेड, कॅलरीज् यांचे अतीप्रमाण आणि त्यामुळे साखरेचं वाढलेलं प्रमाण तसंच मिठाचंही प्रमाण अधिक असल्यानं असे द्रव पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात. मधुमेहासारख्या रूग्णांनी तर अशा पदार्थांना हातदेखील लावू नये, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञ देतात. 


कृत्रिम शीतपेयांत 'हे' वापरलं जातं

कृत्रिम द्रवपदार्थांत साखरेचं प्रमाण हे नियमित साखरेपेक्षा दहा पटीने अधिक असतं. कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफिन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. 


शरीरावर 'हे' परिणाम होतात

फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचं प्रमाण बिघडतं. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्यानं आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता असते. शिवाय दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणं हे दुष्परिणाम तर होतातच. लहान मुलांमध्ये हायपर अॅक्टिव्ह होणं तर गरोदर महिलांनी अशा पेयांच सेवन केल्यास बाळाला व्यंग होण्याची शक्यता असते. सोडियम बेंझाएटचं प्रमाण असलेल्या द्रव पदार्थांच्या अतिसेवनाने अस्थमा, हृदयविकाराचा झटका, रक्तदाब वाढणं, किडनी निकामी होणं, जीवघेण्या अॅलर्जीची रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. द्राक्ष आणि टोमॅटो या द्रव पेयांमध्ये मोनो सोडियम ग्लुटामेट्सचा वापर असल्यानं त्याची चव मिठाप्रमाणे असते. हा घटक आकडीचे आजार, मायग्रेन, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना धोका तसंच मानसिक आजाराला कारणीभूत ठरू शकतो.


कर्करोगाचीही शक्यता

शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, एखादी व्यक्ती जर सातत्यानं शीतपेयाचं सेवन करत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे त्यांना मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिली लीटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते.) शीतपेय एकावेळी घेतल्यास मधुमेह होण्याची शक्यता २० टक्क्यांनी बळावते. शर्कराविरहित पेय अथवा आईस्क्रिम यामध्ये अँस्पोर्टेन या घटकाचे प्रमाण असल्याने कर्करोग होण्याची अाणि पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. 

 कृत्रिम रितीने बनवलेले कोणतेही पेय आरोग्यास धोकादायक आहे. तरीही अशा पेयांचे सेवन करण्यापूर्वी त्यावर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. कोणत्याही ताज्या फळांचा रस सेवन करण्यापेक्षा ते फळ तसंच खाणं आरोग्यास हितकारक आहे. कारण, रसांच्या स्वरूपात शरीरात जाणाऱ्या कॅलरींचे प्रमाण अधिक आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. लहान मुलांसाठी फळांचा पल्प बनवून देणे नेहमीच चांगले ठरते. त्याचप्रमाणे घरी बनवलेले लिंबू पाणी, कोकम सरबत हे आरोग्याला नेहमीच चांगले. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी कोणतेही पेय आरोग्यास पूरक नाही.
- डॉ. रोशनी प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा