राम मंदिर स्थानकावर अपघात झाल्यास 'मुक्ती' निश्चित

Mumbai
राम मंदिर स्थानकावर अपघात झाल्यास 'मुक्ती' निश्चित
राम मंदिर स्थानकावर अपघात झाल्यास 'मुक्ती' निश्चित
राम मंदिर स्थानकावर अपघात झाल्यास 'मुक्ती' निश्चित
राम मंदिर स्थानकावर अपघात झाल्यास 'मुक्ती' निश्चित
राम मंदिर स्थानकावर अपघात झाल्यास 'मुक्ती' निश्चित
See all
मुंबई  -  

पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर या स्थानकावर कुणाचा अपघात झाल्यास जखमी व्यक्तीला स्थानकाबाहेर तातडीने रुग्णवाहिकेची सेवा मिळेल, याची खात्री नाही. दुर्दैवाने अपघातग्रस्ताला 'जीवनमुक्ती' मिळू शकते. शहर  आणि उपनगरातल्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका सेवा असणं अत्यावश्यक आहे, हा नियम असला तरी पश्चिम रेल्वेच्या राम मंदिरसह मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर ही सेवा उपलब्ध नसल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह' च्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.  

108 हा नंबर अत्यावश्यक सेवा दिला जाणारा नंबर म्हणून ओळखला जातो. यामुळेच तो काही महिन्यांतच घराघरात पोहोचला. आता गरजू 108 हा नंबर डायल करुन रुग्णवाहिकेची सेवा मिळवू शकतो. काही दिवसांपूर्वी दादर स्टेशनवर एका तरुणाचा अपघात झाला होता. त्याच्यावर तात्काळ उपचार व्हावा यासाठी धावाधाव करण्यात आली. त्यानंतर त्याला टॅक्सीतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यावेळी अत्यावश्यक सेवा देणारी रुग्णवाहिका स्थानकावर उपलब्ध नव्हती का? असेल तर तिचा योग्य  वापर त्यावेळी का करता आला नाही? मग अशावेळी पीडिताने काय करायचं?अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई लाइव्ह'ने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या स्थानकांचं सर्वेक्षण केलं आणि रेल्वे स्थानकांवर 108 नंबरची अत्यावश्यक सेवा देणारी रुग्णवाहिका असलीच पाहिजे या नियमाखाली प्रत्येक स्थानकावर ही रुग्णवाहिका आहे की नाही? याची खातरजमा केली.

त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील  ( चर्चगेट ते बोरिवली ) दरम्यान प्रत्येक स्थानकावर रुग्णवाहिका असल्याचं समोर आलं. नुकतंच बांधण्यात आलेल्या राममंदिर स्टेशनवर रुग्णवाहिका अजून देण्यात आलेली नाही. तर, मध्य रेल्वेवरील प्रत्येक स्थानकाचं सर्वेक्षण केलं असता ( छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे) येथील काही स्थानकांवर रुग्णवाहिका नसल्याचं समोर आलं.

108 सेवा नसलेली मध्य रेल्वेवरील स्थानके

करीरोड
चिंचपोकळी
सॅंन्डहर्स्ट रोड
मस्जिद

पश्चिम रेल्वेवरील स्थानक

राम मंदिर

मध्य रेल्वेवरील करीरोड, चिंचपोकळी, सॅंन्डहर्स्ट रोड आणि मस्जिद आणि पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर या रेल्वे स्थानकांवर अजूनही 108 रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या स्थानकांवर अपघात झाल्यानंतर रुग्णाला स्ट्रेचरवरून रस्त्यापर्यंत आणले जाते. त्यानंतर खासगी अतितातडीच्या रुग्णवाहिका किंवा टॅक्सीने रुग्णालयात घेऊन जावं लागतं. यातच 15 ते 20 मिनिटं जातात आणि रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याला प्राणाला मुकावं लागतं.

पश्चिम रेल्वेवर केलेल्या सर्वेक्षणात चर्चगेट ते बोरिवली या स्थानकांवर 108 रुग्णवाहिका आढळून आलं. पण, जागेची कमतरता असल्यामुळे रुग्णवाहिका स्टेशनच्या बाहेर उभी करण्यात येते.


‘जर अपघात झाला तर तातडीने रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना सांगितलं जातं. रुग्णवाहिकेत प्रत्येक शिफ्टमध्ये 3 डॉक्टर्स उपलब्ध असतात. तसंच काही आपातकालीन परिस्थिती असेल तर रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. महिन्यातून जवळपास 3 ते 4 अपघात होतात.’

प्रकाश पिंगळे, स्टेशन व्यवस्थापक, महालक्ष्मी

पश्चिम रेल्वेवर नुकत्याच बांधण्यात आलेल्या राम मंदिर स्टेशनवरही रुग्णवाहिका सेवा देण्यात आलेली नाही. आपातकालीन परिस्थितीत नजिकच्या गोरेगाव स्थानकातून रुग्णवाहिका मागवण्यात येते. तसंच रुग्णांना प्राथमिक उपचार दिले जातात, अशी माहिती संबधित अधिकाऱ्यांनी
नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय.

जागा नसल्याकारणाने करीरोड स्थानकावर रुग्णवाहिका नाही. आपातकालीन परिस्थितीत शिवसेनेची रुग्णवाहिका बोलावण्यात येते. तसंच टॅक्सीतूनही रुग्णाला घेऊन जावं लागतं, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय. तसंच चिंचपोकळी स्थानकातही अशीच परिस्थिती आहे. अपघात झाल्यानंतर रुग्णावर प्राथमिक उपचार करून टॅक्सी किंवा खासगी रुग्णवाहिका मागवून रुग्णाला रुग्णालयात नेलं जातं, अशी माहिती संबधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय.

सँडहर्स्ट रोड या स्टेशनवर रुग्णवाहिका असावी अशी मागणी करूनही अजूनपर्यंत रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आलेली नाही. जागा नसल्याचं कारण दिलं जातंय. महिन्याला 10 ते 15 अपघात होतात. त्यामुळे लवकरात लवकर 108 नंबरच्या रुग्णवाहिकेची सेवा सँडहर्स्ट रोड स्थानकाला द्यावी अशी मागणी स्थानक व्यवस्थापक रामेश्वर मीना आणि उपस्थानक उपव्यवस्थापक विनोद सावंत यांनी केलीय.

कुर्ला हे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे एक रुग्णवाहिका पुरेशी नाही. त्यामुळे निदान 2 तरी रुग्णवाहिका द्या, अशी मागणी संबधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केलीय.

आपातकालीन परिस्थितीत स्ट्रेचर, रुग्णवाहिका सर्व उपलब्ध होतं. पण, अपघात झालेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी असणारे हमाल( पोर्टर) उपलब्ध होत नाहीत. प्रसंगी आरपीएफ, जीआरपी जवानांना रुग्णाला रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जावं लागतं. त्यामुळे विक्रोळी स्टेशनवर लवकरात लवकर हमाल (पोर्टर) उपलब्ध करुन देण्याची मागणी स्टेशन मॅनेजर अविनाश करंदीकर यांनी केलीय. तसंच भांडुप स्थानकातही रुग्णवाहिका आहे, पण अपघात झाल्यानंतर उचलण्यासाठी हमाल(पोर्टर) नसल्याचं स्थानक व्यवस्थापक आर.एस.भारती यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.