Advertisement

मुंबईत डासांसाठी ड्रोनद्वारे फवारणी

महापालिकेकडून (BMC) मुंबईत ड्रोनद्वारे डासांसाठी फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत डासांसाठी ड्रोनद्वारे फवारणी
SHARES

डेंग्यू - मलेरियाच्या (dengue and malaria) वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईत ड्रोनद्वारे डासांसाठी फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. धोबीघाट इथून ड्रोन (Drone) फवारणी मोहीम सुरू केली आहे.

मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट करताना दाटी वाटीच्या लोकवस्तीत अडचणी येत असतात. त्यामुळे ड्रोन कॅमेराच्या साहाय्यानं या डासांची उत्पत्तीस्थानं शोधण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता या परिसरांमध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे.

यावेळी महालक्ष्मी धोबी घाट इथं महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. ही संपूर्ण मोहीम त्यांच्या देखरेखीत पार पडली.

महापौर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जी/ दक्षिण विभागातील सर्व वॉर्डमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य चांगले रहावे हा आमचा प्रयत्न असून प्रत्येक वार्डला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

नागरिकांनी आपल्या घरांमध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं महापौर म्हणाल्या.

सीएसआरमधून ड्रोन खरेदी करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत साडेसात लाख रुपयापर्यंत आहे. जी /दक्षिण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या मिल्स, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री अश्या ठिकाणी पावसाळांमध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डांसाची उत्पत्ति होत असते.

सदर ठिकाणी पाहणी करण्याकरीता आणि अळीनाशक फवारणी करण्याकरीता किटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नसल्यामूळे सदर ठिकाणी डासउत्पत्ती होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते. त्याअनुषंगानं स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन खरेदी करून ड्रोनच्या सह्यानं  जून-२०२१ पासून उपरोक्त ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे.

या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा ड्रोन उडवण्यासाठी थींक केअर कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे. तसंच याव्यतिरिक्त कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मच्याऱ्यांमार्फत विभागामध्ये एकूण ६८९ एवढे मलेरियावाहक डांस उत्पत्तीस्थानं शोधून नष्ट करण्यात आली.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचं दिसून आलं आहे.

यावर्षी आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण २०९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या ३ हजार ३३८ रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय गेल्या आठ महिन्यांत गॅस्ट्रोच्या १ हजार ८४८ रुग्णांची नोंद झाली.

डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं शोधून ती काढून टाकली पाहिजेत. साचलेल्या पाण्यात डेंगूच्या अळ्या तयार होत असतात. पाणी साचू देऊ नये असं आव्हान पालिकेकडून केलं जातं आहे.



हेही वाचा

मुंबईतील दानशूर, टाटा मेमोरियल रुग्णालयाला १२० कोटींची जमीन दान

क्लीनअप मार्शलसाठी गणवेश सक्तीचा; मार्शलच्या गैरवर्तणुकीला बसणार चाप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा