Advertisement

'मेडिकल डॉक्युमेंटेशन'वर डॉक्टरांसाठी चर्चासत्र

अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत ३ ते ४ व्यक्तींसाठी एकाच डॉक्टरला काम करावं लागतं. अशा वेळी रुग्णाचं मेडिकल डॉक्युमेंटेशन योग्य पद्धतीने होत नाही. त्याचा परिणाम शेवटी रुग्णाच्या पुढील उपचारांवर होतो.

'मेडिकल डॉक्युमेंटेशन'वर डॉक्टरांसाठी चर्चासत्र
SHARES

महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी असते. त्याचा निवासी डॉक्टरांपासून सर्वांवरच ताण असतो. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत ३ ते ४ व्यक्तींसाठी एकाच डॉक्टरला काम करावं लागतं. अशा वेळी रुग्णाचं मेडिकल डॉक्युमेंटेशन योग्य पद्धतीने होत नाही. त्याचा परिणाम शेवटी रुग्णाच्या पुढील उपचारांवर होतो. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर आणि क्लिनिकल प्रॅक्टिशियन्स यांच्यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.


आयोजन कधी?

गुरूवार १२ एप्रिल रोजी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात मेडिकल निग्लिजन्स या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शिवाय, रुग्णाचं मेडिकल डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीने करायचं? यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे.


चर्चासत्राची आवश्यकता का?

वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निष्काळजीपणा म्हणजे काय किंवा रुग्णांचे अहवाल कसे सांभाळून ठेवावेत याबाबत कुठेही प्रशिक्षण दिलं जात नाही. अनेकदा प्रशिक्षित डॉक्टरांनाही याबाबत माहिती नसते.



हल्ल्याचं वाढतं प्रमाण

महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांत २ डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले. उपचारांदरम्यान एखाद्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकार कानी पडतात. अशावेळी रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर सर्वच बाबतीत निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जातो. अशावेळी उपचारांदरम्यान काय घडलं ? किंवा स्वत: ची बाजू मांडण्यासाठी सरकारी आणि महापालिका रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांकडे स्वतःची बाजू मांडण्यासाठी काहीच पुरावे नसतात. यासाठीच मेडिकल डॉक्युमेंटेशन, मेडिकल कंस्युमरिझम आणि मेडिकल निग्लिजन्स या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.


समिती गठीत करण्याची मागणी

यासंदर्भात मुंबई लाइव्हशी बोलताना मेंदू शल्यविशारद प्रा. डॉ. नितीन डांगे यांनी सांगितलं, केईएम रुग्णालयात ४० विभाग आहेत. दररोज प्रत्येक विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रुग्णांचं व्यवस्थापन, फॅमिली फिजिशिअन, कन्सल्टंटस आणि रूग्णावर यापूर्वी झालेले उपचार या सर्वांच्या फाईल तयार कराव्या लागतात. त्यामुळे वैद्यकीय अहवाल तयार करताना गोंधळ होऊ शकतो. काही वेळेस रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातही बाचाबाची होते. ते सर्व प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतं. यामुळे डॉक्टरांना चौकशी शिवाय वैद्यकीय निष्काळजीपणा प्रकरणी अटक होण्याचे प्रकार घडतात. त्यासाठीच प्रत्येक विभागाची एक स्वतंत्र समिती असली पाहिजे.


महापालिका रुग्णालयात रुग्णांची गर्दी प्रचंड असल्यानं डॉक्टरांवर कामाचा ताण असतो. अशात थोडीतरी चूक झाली तर नातेवाईक स्वत: च कायदा हातात घेतात, मारहाण करतात. शिवाय, अनेकदा रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध न घेता स्वतः चं औषधं घेतात. जे रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं. अशावेळी वैद्यकीय निष्काळजीपणा (मेडिकल निग्लिजन्स) याप्रकरणी डॉक्टरांनाच दोषी ठरवलं जातं. या घटनांमध्ये डॉक्टर आणि रुग्ण दोघेही जबाबदार असतात. हेच समजून घेण्यासाठीच प्रत्येक विभागात समिती गठीत केली पाहिजे.
- डॉ. रवींद्र देवकर, फॉरेन्सिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक



हेही वाचा-

स्तनाच्या कर्करोगासाठी फ्लुओबीम-आयसीजी फ्लुओरोस्कोपी इमेजिंग यंत्र

'टीबी'मुक्तीसाठी आपी, युएसएआयडीचा करार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा