Advertisement

मुंबईला ऑमिक्रॉनपासून दिलासा; त्या ९ जणांपैकी ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह

मुंबईसह देशभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ऑमिक्रॉन'मुळं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबईला ऑमिक्रॉनपासून दिलासा; त्या ९ जणांपैकी ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह
SHARES

मुंबईसह देशभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ऑमिक्रॉन'मुळं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच ऑमिक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या ९ पैकी ७ जणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मुंबईला दिलासा मिळाला आहे. उर्वरित २ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. ऑमिक्रॉन संक्रमित ४० देशांतून मागील महिन्याभरात २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी ४८५ प्रवाशांची कोविड चाचणी केल्यानंतर ९ जण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं. त्यामध्ये ८ मुंबईचे तर १ डोंबिवलीचा रहिवासी आहे.

त्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल मिळण्यास विलंब असल्यानं सद्य:स्थितीत ‘एस-जिन’ चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सर्व १६ रुग्णांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या ९ प्रवाशांवर पालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एखाद्या उच्चभ्रू रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्यास बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी रुग्णालयातही बाधित प्रवाशांसाठी खाटा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग चाचणीची यंत्रणा आहे. मात्र या ठिकाणी एकावेळी २८८ नमुने ठेवावे लागतात. त्यामुळे तातडीने अहवाल मिळावेत यासाठी सर्व १६ बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

ऑमिक्रॉनबाबतच्या सूचना जाहीर होण्याआधी मुंबईत आल्यानंतर कोरोनाबाधित ठरलेल्या प्रवाशांचा शोधही महापालिका घेत आहे. यामध्ये ७ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. त्यामुळं ऑमिक्रॉन संक्रमित देशातून आलेले एकूण १६ प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा