Advertisement

टाटा रुग्णालयात ‘समर स्कूल’चं आयोजन, ७ मे पासून सुरुवात


टाटा रुग्णालयात ‘समर स्कूल’चं आयोजन, ७ मे पासून सुरुवात
SHARES

वैद्यकीय विद्यार्थ्यांना कॅन्सरचं प्रशिक्षण आणि कॅन्सर संदर्भातील माहीती मिळावी, त्यातून त्यांच्यात कॅन्सरसाठी काम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने टाटा मेमोरिअल सेंटरतर्फे 'समर स्कूल'चं आयोजन करण्यात आलं आहे.

सोमवारी ७ मे पासून 'समर स्कूल' या कॅन्सरच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. टाटा मेमोरियल सेंटरने लंडनच्या किंग्ज कॉलेजसोबत, कॅन्सर आजाराचं प्रशिक्षण मिळावं, यासाठी खास प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं आहे. १൦ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात देशभरातून जवळपास १५൦ हून अधिक पदवी न मिळालेले विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी सहभागी झालेत.


३ वर्षांपासून पुढाकार

जगभरातील आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवीन रुग्ण समोर येतात. पण, यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत देशात कॅन्सरसाठी काम करणाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने गेल्या ३ वर्षांपासून टाटा हॉस्पिटलमध्ये 'समर स्कूल'चं आयोजन केलं आहे.

यंदाच्या वर्षी या शिबिरात मुंबई आणि देशभरातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील १५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तर, गेल्या वर्षी एकूण १२० विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते.

दरवर्षी फक्त टाटा रुग्णालयात कॅन्सरचे ६൦ ते ६५ हजार रुग्ण नव्याने दाखल होतात. देशात अडीच हजार मेडिकल, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टची गरज आहे. त्यामुळे अशा प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आम्ही कॅन्सर सर्जन बनण्यासाठीची वृत्ती निर्माण करतो. यंदाच्या वर्षीदेखील शिबिरात सहभागी झालेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये चार आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जाईल.
प्रो. के. एस. शर्मा, शैक्षणिक निर्देशक, टाटा रुग्णालय

या विद्यार्थ्यांना टाटा मेमोरियल सेंटरमधील ७० शिक्षकांसोबत लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील ८ कॅन्सरतज्ज्ञांकडून माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यांना कॅन्सर या आजाराविषयी अधिक माहिती, कॅन्सरचे उपचार, तपासणी, प्रतिबंध या सर्वांची माहिती मिळेल यावर भर दिला जाईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना कॅन्सर बायोलॉजी, थेरेपी यांची माहिती मिळण्यास मदत होईल. या शिबिराच्या अखेरीस विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना टाटा मेमोरियल सेंटर आणि किंग्ज कॉलेजतर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा