Advertisement

'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'ने दिलं जगण्याचं बळ

कॅन्सर झाला हे कळलं तेव्हा डोकं काम करणं बंद झालं. पण, त्यावर तोडगा काढत टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी मला माझं जीवन पुन्हा मिळवून दिलं. डॉक्टरांनी फ्रि फ्लॅप सर्जरीनंतर विद्रूप झालेला माझा चेहरा पुन्हा आहे तसाच करुन दिला, एका अर्थाने मी गमावलेला आत्मविश्वास मिळवून दिल्याचं सांगत रुग्ण बिनोद जमादार (३८) यांनी 'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'चं महत्त्व विषद केलं.

'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'ने दिलं जगण्याचं बळ
SHARES

कॅन्सर झाला हे कळलं तेव्हा डोकं काम करणं बंद झालं. पण, त्यावर तोडगा काढत टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी मला माझं जीवन पुन्हा मिळवून दिलं. खरंतर जीभेचा कॅन्सर झाला हे कळाल्यावर मी पूर्णपणे कोलमडलो होतो. पण, डॉक्टरांनी फ्रि फ्लॅप सर्जरीनंतर विद्रूप झालेला माझा चेहरा पुन्हा आहे तसाच करुन दिला, एका अर्थाने मी गमावलेला आत्मविश्वास मिळवून दिल्याचं सांगत रुग्ण बिनोद जमादार (३८) यांनी 'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'चं महत्त्व विषद केलं.


मनाने खचलो

मूळचे पश्चिम बंगाल इथं राहणारे जमादार यांना नोव्हेंबर २०१३ मध्ये जीभेचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. कॅन्सर झाल्याचं कळलं, तेव्हा सर्वप्रथम कुटुंबियांचा विचार डोक्यात आला. आपल्यानंतर कुटुंबाचं काय होईल? या विचाराने जमादार खचले. पण, शेवटी त्यांनी मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला.


चेहरा विद्रूप होण्याची भीती

जीभेचा कॅन्सर म्हणजे तो भाग काढून टाकावा लागणार आणि आपला आता चेहरा विद्रूप दिसणार ही खंत मनात होती. पण, टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी बिनोद यांना 'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'चा पर्याय सांगितला आणि शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडली.


पायाच्या हाडाने बनवला जबडा

जानेवारी २०१४ मध्ये त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. या 'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'मध्ये त्यांच्या एका पायाचं हाड काढण्यात आलं. त्याच हाडापासून त्यांच्या तोंडाचा जबडा तयार करण्यात आला. शिवाय, त्यांच्या पायाची आणि हाताची चामडी देखील या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आली. तब्बल १२ तासांची शस्त्रक्रिया केल्यानंतर बिनोद यांना नवा चेहरा मिळाला अर्थात पूर्वीसारखाच. शस्त्रक्रियेनंतर बिनोद पुन्हा एकदा नीट खाऊ आणि बोलू शकतात.


जेव्हा पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा माझा चेहरा आधीसारखा दिसत नव्हता. पण, 'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'मुळे मला माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला. मला माहीत देखील नव्हतं की अशी सर्जरी केल्यामुळे मी पुन्हा आधी सारखा दिसू शकेन. पण, आता मी खूप आनंदी आहे.

- बिनोद जमादार, फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी केलेला रुग्ण


बघूनही वाटणार नाही कॅन्सर होता म्हणून

अशीच एक घटना वंदना श्रीवास्तव यांच्यासोबत घडली. तोंडाच्या आत एक सफेद डाग आहे आणि त्यामुळे खाण्यासाठी, पिण्यासाठी त्रास होत असल्याचं वंदना यांना जाणवत होतं. पण, तो डाग नसून कॅन्सरची गाठ आहे हे कळल्यावर आम्ही थेट जबलपूर मध्यप्रदेशहून टाटा रुग्णालयात आलो. ६ महिन्यांपूर्वीच वंदना यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं. शिवाय, त्या ऑपरेशन नंतर 'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी' देखील झाली. आता त्यांच्याकडे बघितलं तरी वाटणार नाही की कधी काळी त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांचं ऑपरेशन झालं होतं.


टाटा रुग्णालयात आले तेव्हाही डॉक्टरांनी नेमकं काय झालं ते सांगितलं नाही. फक्त सांगितलं एक छोटसं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यानंतर लगेच दाखल होऊन मी सर्जरी केली आणि आता मी सर्व काही करु शकते. माझ्या या सर्जरीसाठी उजव्या पायाचं हाड माझ्या जबड्यासाठी वापरण्यात आलं आहे.

- वंदना श्रीवास्तव, फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी केलेला रुग्ण



हेही वाचा-

टाटा रुग्णालयाचा अनोखा विक्रम, १२ वर्षांत केल्या ५ हजार फ्री फ्लॅप प्लास्टिक सर्जरी

डाॅक्टरांची 'कट प्रॅक्टिस' अन् रुग्णांच्या खिशाला कात्री! कशी? ते समजावून घेऊया


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा