Advertisement

मुंबईतील लसीकरण गुरुवारपासून पुन्हा सुरळीत


मुंबईतील लसीकरण गुरुवारपासून पुन्हा सुरळीत
SHARES

लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे बुधवारी लसीकरण मोहीम महापालिका आणि सरकारी केंद्रावर बंद ठेवण्यात आली होती. मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. १ लाख ५ हजार कोविड प्रतिबंधक लसींचा साठा महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे गुरुवारपासून कोविड लसीकरण मोहीम पुन्हा सुरु होणार आहे. कोविशिल्डचे ५७ हजार तर कोवॅक्सिनचे ४८ हजार डोस पालिकेला मिळाले आहेत.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. १८ वर्षांवरील ९० लाख लाभार्थी मुंबईत आहेत. यापैकी आतापर्यंत ७३ लाख ३६ हजार १७१ नागरिकांनी लस घेतली आहे. दररोज एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. खासगी केंद्रामार्फतही लस दिली जात असल्याने हे लक्ष्य गाठणे पालिकेला शक्य होत आहे. 

मुंबईत एकूण ३१४ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी २२७ प्रभागांमध्ये असलेल्या एकूण २७० लसीकरण केंद्रावर आता १८ वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना थेट जाऊन (वॉक इन) लस घेता येणार आहे. मात्र गर्भवती महिला, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विदेशात नोकरी - व्यवसायासाठी जाणारे नागरिक यांना त्यांच्यासाठी निर्देशित केलेल्या लसीकरण केंद्रावरच लस देण्यात येणार आहे. तर २२७ प्रभागातील केंद्र वगळता इतर सर्व शासकीय व महापालिका रुग्णालये आणि कोविड केंद्रातील लसीकरण केंद्रात ५० टक्के नोंदणी आणि ५० टक्के वॉक इन लसीकरण केले जाणार आहे.

सर्व लसीकरण केंद्रांवर प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या डोससाठी ३० टक्के तर दुसऱ्या डोससाठी ७० टक्के लस साठा उपयोगात आणला जाणार आहे. वॉक इन आणि नोंदणी ह्या दोन्ही पद्धतीमध्ये हेच सूत्र पाळले जाणार आहे. एका केंद्रांवर दिवसभराच्या सत्रात १०० डोस दिले जाणार असतील तर त्यात ३० लस पहिला डोस घेणाऱ्यांना तर ७० लस दुसऱ्या डोससाठी असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा